IND vs PAK सरकारने ठरवलंय पाकिस्तानसोबत सामना खेळायचं तर… सुनील गावस्कर स्पष्टच बोलले

आशिया कपमध्ये आज हिंदुस्थान व पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. पहलगाम हल्ल्याला अजून सहा महिनेही झाले नाही आणि बीसीसीआय पाकिस्तानसोबत सामना खेळायला तयार झाली आहे, यावरून सध्या केंद्र सरकार व बीसीसीआयवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. देशातील नागरिकांनी या सामन्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र सरकार हा सामना खेळवण्यावर अडून बसले आहे. यावर बोलताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ”सरकारने जर पाकिस्तानसोबत सामना खेळायचं ठरवलं असेल तर आपण त्यावर बोलून काहीही होणार नाही, असे म्हटले आहे.

सुनील गावस्कर यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. ”आता यावर बोलून काहीही फरक पडणार नाही. आपल्या सरकारने तर ठरवलं आहे की पाकिस्तानसोबत खेळायचंच. त्यामुळे आता तुम्ही बोला किंवा मी बोलल्याने काही फरक पडणार नाही. बीसीसीआयच्या खेळाडूंना देखील सरकार जे बोलेल तेच ऐकावं लागेल. मी सर्वांच्या भावना समजतो. पण त्यामुळे आता या सामन्यावर काही परिणाम होणार नाहीये’, असे सुनील गावस्कर म्हणाले.

तिकीट विक्रीला थंड प्रतिसाद

पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये म्हणून हिंदुस्थानात प्रचंड विरोध असतानाही हा सामना खेळविला जात आहे. मात्र आता या सामन्याला हिंदुस्थानी प्रेक्षकांनी आगळ्या पद्धतीने विरोध दर्शवल्याचे समोर आलेय. ज्या सामन्याची तिकिटे चार मिनिटांत विकली जातात, तो सामना रविवारी खेळविला जाणार आहे आणि त्याची हजारो तिकिटे अजूनही शिल्लक आहेत. ही थंड तिकीटविक्री पाहता या सामन्याची क्रेझही कमी झाल्याचे दिसत आहे.