ICC Women’s ODI Rankings – स्मृती मानधनाने सिंहासन काबीज केलं, महिला फलदाजांच्या क्रमवारीत पटकावला पहिला क्रमांक

ICC च्या ताज्या क्रमवारीनुसार हिंदुस्थानची स्टार फलंदाज आणि महाराष्ट्राची लेक स्मृती मानधनाने वनडेमध्ये महिला फलंदाजांच्या क्रमवारीत सिंहासन काबीज केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात स्मृतीने अर्धशतक झळकावलं होत. याचा फायदा तिला क्रमवारीत झाला आणि तिने दुसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर उडी मारली आहे. परंतु खेदाची बाब म्हणजे स्मृती व्यतिरिक्त एकही हिंदुस्थानी फलंदाज अव्वल दहामध्ये नाहीय.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात स्मृतीने 63 चेंडूंमध्ये 58 धावांची खेळी केली होती. परंतु या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आणि ऑस्ट्रेलियाने 1-0 आघाडी घेतली आहे. या सामन्यात स्मृतीचा खेळ बहरदार राहिला आणि त्याचाच फायदा तिला ICC च्या ताज्या क्रमवारीत झाला. तिने या बाबतीत इंग्लंडच्या नॅट सायव्हर-ब्रंट ला मागे टाकलं आहे. ताज्या क्रमवारीनुसार स्मृती मानधना 735 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आणि नॅट सायव्हर-ब्रंटची 731 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर 12 व्या स्थानावर आणि जेमिमा रोड्रिग्स 15 स्थानावर आहेत.