डोपिंग टेस्ट प्रकरणी ICC ची मोठी कारवाई, नेदरलॅंडच्या खेळाडूवर तीन महिन्यांची बंदी

नेदरलँडचा वेगवान गोलंदाज व्हिव्हियन किंग्माला ICC ने मोठा झटका दिला आहे. ICC पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 मध्ये 12 मे रोजी UAE विरुद्ध नेदरलँडचा सामना खेळला गेला होता. हा सामना खेळला गेल्यानंतर ड्रग चाचणी केली असता व्हिव्हियन किंग्मा पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर तीन महिन्यांची बंदी घातली आहे.

स्पोर्टपार्क मार्सचॉकरविर्ड येथे नेदरलँड आणि UAE यांच्यात लढत झाली. या सामन्यात नेदरलँडने पाच विकेटने बाजी मारत सामना जिंकला. मात्र, सामना पार पडल्यानंतर घेण्यात आलेल्या डोपिंग चाचणीमध्ये व्हिव्हियन किंगमा पॉझिटिव्ह आढळून आला. या सामन्यात त्याने 7.3 षटकांमध्ये फक्त 20 धावा देत चांगली गोलंदाजी केली होती. 30 वर्षीये किंग्मा बेझोयलकॉग्नाइनचे सेवन केल्यामुळे पॉझीटीव्ह आढळून आला होता. बेझोयलकॉग्नाइन हे कोकेनचे मेटाबोलाइट असून आयसीसी अँटी-डोपिंक कोड अंतर्गत त्याच्यावर बंदी आहे. याप्रकमी किंग्माने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यामुळे त्याच्यावर 15 ऑगस्टपासून तीन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.