
पंढरपूर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, त्याला कॉरिडॉर करून पर्यटनस्थळ बनवू नका, येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करा, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील वकील व डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे सहकारी ऍड. जगदीश शेट्टी यांनी केली.
पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र बचाव कॉरिडॉर विरोधी कृती समितीच्या वतीने एकनाथ भवन येथे रविवारी (दि. 14) सायंकाळी कॉरिडॉर विरोधात मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची टीम आली होती. यावेळी सुप्रसिद्ध विधीज्ञ जगदीश शेट्टी हे बोलत होते. यावेळी विनोद रानवल, आदित्य कुमार, धीरज राघवन, पंढरपूर येथील ऍड. धनंजय रानडे, आशुतोष बडवे, आदित्य फत्तेपूरकर, अभय इचगावकर, वीरेंद्र उत्पात, रामकृष्ण महाराज वीर आदी उपस्थित होते.
जगदीश शेट्टी म्हणाले, कॉरिडॉरचे संकट दूर करण्यासाठी संघटित व्हा, घाबरून जाऊ नका, जास्त काळजी करू नका, आपण जिंकू शकतो, कोणत्याही आंदोलनात दिशाभूल केली जाऊ शकते, फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो. संघटित राहून लढा दिल्यास आपण सरकार विरोधातदेखील जिंकू शकतो, याचप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरदेखील सरकारच्या ताब्यातून मुक्त करू शकतो, कोणतेही सरकार पारंपरिक व धार्मिक अधिकारी हिरावून घेऊ शकत नाही. डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी तामिळनाडू येथील नटराज मंदिर मुक्त केले आहे तसेच उत्तराखंड येथील 51 मंदिरे सरकारच्या ताब्यातून मूळ पुजाऱ्यांच्या ताब्यात दिली आहेत.
वाराणसी, अयोध्या येथील कॉरिडॉर झाला; पण तिथे भाजप उमेदवार पडले आहेत. आज संपूर्ण जग हे हिंदूंच्या विरोधात आहे; पण हार मानू नका, लढलो तर यश निश्चितच आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ऍड. धनंजय रानडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अभयसिंहराजे इचगावकर यांनी केले. सूत्रसंचालन रामकृष्ण महाराज वीर यांनी, तर आभार डॉ. प्राजक्ता बेणारे यांनी मानले.