खंडेनवमीपासून मराठा आरक्षणाची नवीन लढाई

Photo - Rupesh Jadhav

मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा महत्त्वाचा पुरावा असणाऱ्या कोल्हापूर गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर मराठा आरक्षणाची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 ऑक्टोबर रोजी खंडेनवमीच्या दिवशी संविधान, तसेच कोल्हापूर गॅझेट आणि वही-पेन या शस्त्रासहितच्या खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पूजन करून या नवीन आंदोलनाची सुरुवात करणार असल्याची माहिती प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई आणि ‘कॉमनमॅन’ संघटनेचे ऍड. प्रवीण इंदुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी केलेल्या नोंदीनुसार कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा हेच कुणबी असल्याचे पुरावे आहेत. पण आरक्षणाचे जनक असलेले लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील या गॅझेटचा आजपर्यंत प्रशासकीय पातळीवर विचारही झाला नाही. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे सरकारने हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत ‘जीआर’काढला आहे. त्याचबरोबर सातारा गॅझेटचेही काम महिनाभरात पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिह्यामध्ये कोल्हापूर गॅझेटनुसार आजपर्यंत आरक्षणापासून वंचित असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे बनले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व मराठा संघटनांना एकत्रित करून खंडेनववीपासून हा नवीन लढा सुरू करणार असल्याचे दिलीप देसाई आणि प्रवीण इंदुलकर यांनी सांगितले.