
संगमेश्वर तालुक्यातील साडवली कासारवाडी गावात एक बिबट्या अडकल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस पाटलांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याची सुखरूप सुटका केली आहे.
बुधवारी (17 सप्टेंबर 2025) सकाळी साडवली कासारवाडी गावातील रहिवासी राजेंध्र धने यांच्या घरामागे हा बिबट्या अडकला होता. साधारण सकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बिबट्या एकाच जागी शांत बसलेला होता, त्यामुळे त्याला पकडणं थोड सोप्प झालं. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. नंतर वन्यजीव पशुवैद्यक युवराज शेटे आणि संतोष वाळवेकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय साधारण 3 ते 4 वर्षे आहे. त्याच्या डाव्या पायाच्या मागील मांडीला जखम झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे त्याला चालता येत नव्हते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर त्वरित उपचार केले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वनविभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यामध्ये सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड, परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार आणि जितेंद्र गुजले, वनपाल सागर गोसावी, सारिक फकीर, तसेच वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे, सूरज तेली, नमिता कांबळे, श्रावणी पवार, विशाल पाटील, दत्तात्रय सुर्वे आणि रणजीत पाटील यांचा समावेश होता. साडवलीचे पोलीस पाटील आणि गावातील इतर ग्रामस्थही यावेळी मदतीला उपस्थित होते.