ठाण्यात बिबट्याला कुत्रा नडला; वसंत विहार परिसरातील सीसीटीव्हीत थरार कैद

अत्यंत गजबजलेल्या वसंत विहार परिसरात बिबट्या एका तगृहसंकुलात घुसला आणि त्याने थेट या कुत्र्याच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला, पण हा कुत्रा त्याला नडला. या हल्ल्यात कुत्रा रक्तबंबाळ झाला, तरीही त्याने बिबट्याशी झुंज दिली. कुत्र्याच्या जोरजोरात भुंकण्यामुळे बिबट्या भेदरला आणि संकुलाच्या भिंतीवर उडी मारून पळून गेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कुत्रा बचावला असला तरी बिबट्याच्या या मोकाट संचारामुळे वसंत विहार परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

कुत्र्याच्या गळ्याला चावा
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह असलेल्या वसंत विहार येथे इडन वूड गृहसंकुल आहे. या गृहसंकुलाच्या अगदी जवळच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असतो. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने थेट या गृहसंकुलात प्रवेश केला. या गृहसंकुलातील भटक्या कुत्र्यावर त्याने हल्ला केला. बिबट्याने कुत्र्याच्या गळ्याला जबरदस्त चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

ठाण्यात दिवसेंदिवस झाडे तोडून नागरीकरण होत आहे. वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढू लागल्याने वन्यप्राणी गृहसंकुलामध्ये फिरताना दिसू लागले आहेत. ठाण्यातील वसंत विहारपासून येऊर वनक्षेत्र आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सीमा नजीक असून या भागात वनसंपदादेखील अफाट आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी भटक्या श्वानांच्या किंवा इतर भक्ष्याच्या शोधात नागरी क्षेत्रात येत असल्याचा दावा वनअधिकारी यांनी केला आहे.

बिबट्या आल्याची माहिती मिळाली असता आमच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. इडन वूड या गृहसंकुलात जनजागृती करण्यात येत आहे. समोरच बंद कंपनी असून बाजूला राष्ट्रीय उद्यान आहे. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्या आला असावा. रहिवाशांनी घाबरू नये. फक्त खबरदारी घ्यावी.
– नरेंद्र मुठे ( वनअधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान)