…तर अती तिथे माती होते, पणनमंत्री जयकुमार रावल यांचा पुणे बाजार समितीला इशारा

पुणे बाजार समिती संचालक मंडळाच्या कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना वारंवार दिल्या आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे वाईट असते. त्यामुळे शेवटी अति तिथे माती होते, असा सूचक इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाला दिला.

पुणे दौर्‍यावर तीन दिवस असलेले पणन मंत्री रावल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाकडून ई निविदा न राबवता मर्जीतल्या लोकांना टेंडरचे वाटप केले आहे. पेट्रोल पंपदेखील केवळ नोटरीवर दिला आहे. सुरक्षा रक्षक आणि मनुष्यबळ पुरवण्याच्या कामांमध्ये 50 माणसे उपस्थित असताना प्रत्यक्षात 150 लोकांच्या नावावर बोगस बिले काढली आहेत. या भ्रष्ट्र कारभारासह विरोधकांच्या कोट्यवधींच्या आरोपांकडे मंत्री रावल यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले.

यावर पणन मंत्री रावल म्हणाले, संचालक मंडळाकडून अशी कामे होत असतील तर चुकीची आहे. आजवर आलेल्या तक्रारींवर बाजार समितीचे सचिव आणि संचालक मंडळाला तशा सूचना दिल्या आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे वाईट असते. त्यामुळे शेवटी अति तिथे माती होईल.

चौकशी समितीचे अधिकारी बदलणार

पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीवर रावल म्हणाले, या समितीमधील प्रमुख जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप आणि दिगंबर हौसारे हे निर्णयप्रक्रियेत असल्याने त्यांना वगळण्याची मागणी होत आहे. त्यानुसार चौकशी समितीचे अधिकारी बदलले जातील. चौकशीसाठी चांगले वरिष्ठ अधिकारी देण्याचे प्रयत्न आहेत, असेही त्यांनी नमूद केले.