सेबीची अदानी समूहाला क्लीन चिट, हिंडनबर्गचे आरोप फेटाळले

अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेले शेअरच्या हेराफेरीचे आरोप हिंदुस्थानी बाजार नियामक मंडळाने (सेबी) फेटाळले आहेत. अदानी समूहावरील आरोपांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. अदानी समूहाने कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असे सेबीने स्पष्ट केले आहे.

अदानी समूहाने आपल्या कंपन्यांच्या शेअरचे भाव कृत्रिमरित्या फुगवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. अदानी समूहाने अनेक बनावट कंपन्या स्थापन करून त्यांच्यामार्फत शेअर मार्केटवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असे आरोप हिंडनबर्गने 2023 च्या जानेवारी महिन्यात केले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. विरोधकांनी अदानी यांच्यासह केंद्र सरकारवरही जोरदार हल्ला चढवला होता.