शिवडा, शिंगटी, वामवर खवय्यांच्या उड्या; माशांसाठी पोलादपुरात ‘गळ’ लागले

पावसाळ्यातील गोड्या पाण्यातील माशांवर ताव मारल्यानंतर आता खवय्यांच्या शिवडा, शिंगटी, वामवर उड्या पडत आहेत. गणेशोत्सव झाल्यानंतर पोलादपूर तालुक्यातील सावित्री, ढवळी, कामथी नदीच्या काठावर मासे पकडण्यासाठी गळ टाकून बसणारे तरुण मोठ्या संख्येने दिसत आहेत. मासे विक्रीतून रोजगार मिळत असल्याने आदिवासी बांधवांच्या हाती पैसा खुळखुळू लागला आहे.

रायगड जिल्ह्यातील अनेक गावांत नदीमध्ये गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. ही मासेमारी जाळीच्या अथवा गळाच्या सहाय्याने केली जाते. खवल, मळ्या, दांडाळी, पांढरे मासे नदीत मुबलक मिळतात. मात्र गणेशोत्सवानंतर पावसाचा जोर कमी झाला की नदीत शिंगटी, वाम, शिवडा हे मासे गळाने पकडण्यासाठी झुंबड उठते. हे मासे चविष्ट असल्याने खवय्यांची अधिक पसंती असते.

तालुक्यातून सावित्री, ढवळी, कामथी नद्या वाहतात. या नद्यांमध्ये आदिवासी जाळे टाकून बाराही महिने मासेमारी करतात. हे मासे पोलादपूर मुख्य बाजारात विक्रीसाठी आणले जातात. पोलादपूरकर मोठ्या आवडीने हे मासे विकत घेऊन खातात. काही हौशी नागरिक मासे विकत न घेता आवडीने मासे पकडण्यासाठी स्वतः जातात व गळ पद्धतीचा अवलंब करतात. गणेशोत्सवानंतर हे चित्र मोठ्या संख्येने गावागावात दिसत आहे.

फक्त दोन महिने दर्शन

वाम माशाला बाजारपेठेत २०० ते २५० रुपये दर मिळतो. याला वाम असेही मिळतात. वाम माशाला पोलादपुरात ‘सुतेरी’ या नावानेही ओळखतात. त्यामुळे हा मासा बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी आदिवासी धडपड करत असतात. वाम मासा दुर्मिळ असून वर्षातून फक्त सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांतच त्याचे दर्शन होते. उर्वरित दहा महिने हा मासा नदीत दिसतही नाही.