फेरीवाला बनला चोरटा, एक्सप्रेसमधील चोरी प्रकरणी आरोपीला अटक

बॅग खेचून पळणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करताना एक्स्प्रेसमधून पडून महिला आणि तिचा डॉक्टर जखमी झाले होते. अपघातात डॉक्टरला हातदेखील गमवावा लागला होता. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी मोहम्मद सैफ ऊर्फ असगर अली चौधरीला अटक केली. तो दिल्लीचा रहिवासी असून त्याच्या विरोधात मुंबईत काही केसेस आहेत. पूर्वी तो ट्रेनमध्ये फेरीवाला म्हणून काम करायचा. तो आता पनवेल-कुर्ला मार्गावर सोनसाखळी आणि बॅग चोरी करू लागला.

नवी मुंबई येथे राहणारे डॉक्टर जोडपे हे जून महिन्यात नांदेडला जात होते. त्यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एक्स्प्रेस पकडली. एस 4 कोचमधून ते प्रवास करत होते. तक्रारदार महिला या खांद्याला पर्स लावून झोपल्या होत्या. एक्स्प्रेस भांडुप स्थानकात आल्यावर स्लो झाली तेव्हा अज्ञात चोरटा हा तेथे आला. त्याने महिला डॉक्टरची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. त्या खेचाखेचीत चोरट्याने महिलेला डब्याच्या खाली खेचले. खाली खेचल्याने त्यांना मुका मार लागला. हा प्रकार त्याच्या पतीच्या लक्षात आला. महिला डॉक्टर या खाली पडल्याचे पाहून त्यांनीदेखील धावत्या एक्स्प्रेसमधून उडी मारली. गाडीतून उडी मारल्याने त्यांचा तोल गेल्याने एक हात कोपरापासून तुटून वेगळा झाला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

जुलै ते ऑगस्टमध्येच करतो गुन्हे

चौधरीविरोधात सोनसाखळी आणि बॅग चोरीचे एकूण 34 गुन्हे दाखल आहेत. तो जुलै ते ऑगस्ट महिन्यात मुंबईत येतो. मुंबईत गुन्हे करतो. पूर्वी चौधरी हा एक्स्प्रेसमध्ये फेरीवाला म्हणून काम क्रम करायचा. त्यानंतर तो हार्बर मार्गावर चोऱ्या करू लागला.