
क्रिकेट जगताला सर्वाधिक 21 कसोटीपटू देणारे मुंबई क्रिकेटचं मंदिर असलेल्या ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखान्याच्या भव्यदिव्य नव्या वास्तूच्या निमित्ताने नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या या हस्ते नव्या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. तब्बल दीड वर्षानंतर शिवाजी पार्क जिमखान्याची राजेशाही थाटात उभी राहिलेली वास्तू पाहून आज क्रिकेटप्रेमींचं मन अक्षरशः भारावून गेलं होतं.
वडापाव आणि सचिन तेंडुलकर
वडापाव आणि मुंबईकर यांचं नातं कधीच न संपणारं! महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही या क्रिकेटकथेची आठवण ताजी करताना आपल्या वडापावचे किस्से आवर्जून सांगितले. लहानपणी प्रॅक्टिस संपल्यानंतर मी मित्रांसोबत जय आणि गोपालचा वडापाव खायचो. आज तिथे भव्य जिमखाना उभा आहे, हे पाहून मन भरून आलं. या जिमखान्याच्या पुनर्निर्माणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या सहकार्याचाही उल्लेख केला.
दिग्गजांची उपस्थिती
ऐतिहासिक वारसा आणि आधुनिकतेचं संगम लाभलेल्या या जिमखान्याचा नव्या वास्तूचे दिमाखात सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार अनिल देसाई, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार महेश सावंत, क्रिकेटपटू पारस म्हांब्रेसह जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे, कार्याध्यक्ष दीपक मुरकर, सचिव संजीव खानोलकर, संयुक्त सचिव सुनील रामचंद्रन, विश्वस्त लता देसाईंसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
जिमखान्याच्या नव्याने झळाळी लाभलेल्या वास्तू निर्मितीनंतर व्यवस्थापनाची जबाबदारी अधिक वाढली आहे. महिला क्रिकेटपटूंना अधिकाधिक सुविधा पुरवण्याचे जिमखान्याचे ध्येय असल्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे यांनी सांगितले. नवीन जिमखान्याला ‘विम्बल्डन ग्रीन व बेज’ रंग देण्यात आला असून, लवकरच महिला क्रिकेट संघही स्थापन करण्याची योजना असल्याचे सांगितले.
महिलांच्या स्वतंत्र ड्रेसिंग रूमचे कौतुक
तेंडुलकरने जिमखाना व्यवस्थापनाचं मनापासून कौतुक केलं. तो पुढे म्हणाला, मला सर्वाधिक आनंद याचा आहे की इथे नव्या जिमखान्यात महिलांसाठी स्वतंत्र ड्रेसिंग रूम बांधण्यात आलाय. मुंबई क्रिकेटमध्ये फार कमी जिमखान्यांकडे अशी सोय आहे. महिला क्रिकेट झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येक जिमखान्याने अशी व्यवस्था करावी, असे आवाहनही सचिनने याप्रसंगी सर्व क्रिकेट क्लब आणि जिमखान्यांना केलं. महिला क्रिकेटसाठी जिमखान्याने घेतलेल्या पुढाकाराचा मुंबई क्रिकेट संघटनेच्या स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या मुलींना फायदा होणार आहे. तसेच शिवाजी पार्क जिमखान्याची ही पहिली इनिंग्स सुरू झाली आहे. इथल्या सुविधा मुला-मुलींनी पूर्णपणे वापरून घ्याव्यात, मेहनत घ्यावी आणि जिमखान्याचं, मुंबईचं आणि अख्ख्या हिंदुस्थानचं नाव उज्ज्वल करावं, हीच माझी खेळाडू म्हणून इच्छा असल्याचेही सचिन म्हणाला.