ठाणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वी, कॅडबरी जंक्शन ते गायमुख… पहिला टप्पा डिसेंबरअखेर सुरू होणार

नागमोडी वळणे घेत रंगीबेरंगी फुलांनी सजलेली आणि नव्या नवरीप्रमाणे नटलेली ठाण्याची मेट्रो आज घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी झोकात धावली. मेट्रोची तांत्रिक चाचणी यशस्वी होताच टाळ्यांचा गजर करीत नागरिकांनी मेट्रोचे स्वागत केले.

कॅडबरी जंक्शन ते गायमुख हा पहिला टप्पा डिसेंबरअखेरपर्यंत सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली, तर सर्व टप्पे 2026 अखेरपर्यंत प्रवाशांसाठी खुले होणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून वडाळा ते गायमुख (मेट्रो 4) या मार्गाचे काम एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. आता लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे. आज गायमुख ते विजय गार्डनदरम्यान मेट्रोची चाचणी घेण्यात आली. या चाचणीच्या वेळी ठाणेकरांनी तुफान गर्दी केली होती. निळ्या व पांढऱया रंगाची मेट्रो प्रत्यक्षात धावली तेव्हा उपस्थितांच्या चेहऱयावरील आनंद दिसत होता. अनेक अडथळे पार करत ठाण्याची मेट्रो अखेर ट्रकवर आली असून उड्डाणपूल, मार्गिका व ओव्हरहेड इक्विपमेंट ही पायाभूत कामे पूर्ण झाली आहेत. कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टीने हिरवा कंदील दिल्यानंतर डिसेंबरअखेरपर्यंत कॅडबरी जंक्शन ते गायमुख या दरम्यान मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

दहा स्थानके

कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनी पाडा, गायमुख.

35 किलोमीटरचा मार्ग; 16 हजार कोटींचा खर्च

मेट्रो 4 ची लांबी 32 किलोमीटर व मेट्रो 4 अ ची 2.81 किमी मिळून एकूण मार्ग 35 किलोमीटरचा आहे. या प्रकल्पासाठी 16 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. रोज अंदाजे 13 लाख 47 हजार प्रवासी प्रवास करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

श्रेयवादाची मेट्रोही सुसाट

ठाण्यात आज मेट्रोची चाचणी होताच श्रेयवादाची मेट्रोही सुसाट धावू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी येणार म्हणून रविवारपासूनच घोडबंदर मार्गावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बॅनरबाजी केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनीदेखील झेंडे व फलक लावून आमच्यामुळेच कशी मेट्रो आली, असे सांगत श्रेय उपटण्याचा प्रयत्न केला.