जायकवाडीच्या आपात्कालीन 9 दरवाजांसह सर्व 27 दरवाजे 2 फुटांनी उघडले; 94 हजार 320 क्युसेकचा विसर्ग

जायकवाडी धरणाचे 9 आपत्कालीन दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले आहेत. सर्व २७ दरवाज्यातून ८९ हजार ६०४ क्युसेक याप्रमाणे जलविसर्ग सुरू करण्यात आला असून गोदावरी नदीच्या पात्रात जलफुगवटा वाढला आहे. त्यामुळे नदी काठावरच्या गावांमध्ये पुरस्थीती निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी केले आहे.

आज दि. २३ रोजी भल्या पहाटे ५ वाजता जायकवाडी धरणाचे द्वार क्रमांक १ ते ९ असे एकूण ९ आपत्कालीन द्वार दरवाजे दीड फूटांपर्यंत उघडण्यात आले. याद्वारे गोदावरी नदी पात्रात ४ हजार ७१६ क्युसेक इतका तर उर्वरित १८ दरवाज्यातून ८४ हजार ८८८ क्युसेक असा एकूण ८९ हजार ६०४ क्युसेक एवढा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान नाथसागर जलाशयात पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येईल. त्यामुळे गोदाकाटच्या १४ गावांतील नागरिकांनी सावधान राहावे. नदिच्या पाण्यातील विद्युत मोटारी, शेतीमाल व कृषी साहित्य काढून घ्यावे. काठावर बांधलेल्या पशुधनाला सुरक्षित ठिकाणी हलवावे. असे आवाहन जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी केले आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात ५ वेळा जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडावे लागले. नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यावर दि. ३१ जूलै ते ५ ऑगस्ट असे ५ दिवस १८ दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट वर करण्यात आले होते. यानंतर नाथसागर जलाशयातील पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली. वरच्या भागातील सर्वच २१ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले. हे सर्व पाणी गोदावरी नदीच्या पात्रातून थेट नाथसागरात येऊ लागल्यावर दि. १९ ऑगस्ट रोजी पुन्हा १८ दरवाजे प्रारंभी अर्ध्या फुटांनी व नंतर १ फूट वर करण्यात आले. १२ सप्टेंबर रोजी तिसऱ्यांदा दरवाजे ऊघडण्याचा निर्णय घेण्यात आला. तिसऱ्यांदा मात्र आपत्कालीन ९ दरवाज्यांसह सर्वच २७ दरवाजे उघडण्यात आले होते. यावेळी तब्बल सव्वा लाख क्युसेकचा अजस्त्र जलौघ गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला होता. चौथ्या वेळी ३ दिवस दरवाजे उघडण्यात आले होते. आता पाचव्यांदा धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ७ दिवसांपासून सतत विसर्ग सुरू आहे.