
नाशिक-मुंबई महामार्गावरील साईबाबा खिंडीजवळ भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेला भरधाव वाहनाने तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाला.
कसारा येथे राहणारे सोपान चव्हाण हे नातेवाईक महिलेसह शनिवारी रात्री इगतपुरीहून कसाऱ्याच्या दिशेने जात होते. ते साईबाबा खिंडीजवळ पोहोचले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सोपान हे रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच दुचाकीवरील महिलेला अन्य वाहनाने अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर दोन्ही वाहनचालकांनी घटनास्थळावरून पळ काढला. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित यांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.