
ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाला गुरुवारी ९५ वर्षे पूर्ण होत आहेत. २५ सप्टेंबर १९३० साली झालेला हा सत्याग्रह देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण ठरला होता. सत्याग्रहातील हुतात्म्यांना गुरुवारी मानवंदना देण्यात येणार आहे. चिरनेर येथील हुतात्मा स्मृती स्तंभाजवळ बंदुकीच्या २१ फैरी झाडून शासकीय इतमानात हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग चळवळीने जोर धरला होता. चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. शांततेत सुरू असलेल्या जंगल सत्याग्रहात शेतकरी, आगरी, आदिवासी असे सुमारे दोन हजार आंदोलक सहभागी झाले होते. या लढ्यात उरण तालुक्यातील धारातीर्थी पडलेल्या आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने उरण परिसरातील त्यांच्या मूळगावी उभारली आहेत. स्वातंत्र्य संग्रामातील या महत्त्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक
‘जंगल का कायदा तोड दिया’, ‘भारत छोडो’ असा नारा देत चिरनेरच्या आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयीपणे बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात धाकू फोफेरकर, नवश्या कातकरी, रामा कोळी, हसुराम घरत, रघुनाथ न्हावी, परशुराम पाटील, आनंदा पाटील, आलू म्हात्रे या आठ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहती दिली