हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात 97 तेजस फायटर दाखल होणार, 62 हजार कोटींचा मेगा डिफेन्स करार

हिंदुस्थानच्या शत्रूंना धडकी भरवणारी बातमी आहे. हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात 97 तेजस मार्क 1-A फायटर विमानं दाखल होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने हिंदुस्थान एरोनॉटिक्सशी 62,370 कोटी रुपयांचा करार केला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असल्याचे मानले जात आहे.

कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने या मोठ्या खरेदीला मंजुरी दिल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर हा करार करण्यात आला. सरकारी मालकीच्या या एरोस्पेस दिग्गज कंपनीसोबतचा हा दुसरा करार आहे.

या 97 LCA Mk1A विमानांमध्ये 68 सिंगल-सीटर लढाऊ विमाने आणि 29 डबल-सीटर ट्रेनर विमाने आहेत. या विमानांची डिलिव्हरी 2027-28 मध्ये सुरू होईल आणि सहा वर्षांत ती पूर्ण होईल. फेब्रुवारी 2021 मध्ये, केंद्र सरकारने HAL सोबत 83 मार्क 1A विमानांसाठी ऑर्डर दिली. हा करार 46,898 कोटी रुपयांचा होता, ज्याची डिलिव्हरी 2028 मध्ये होणार होती.

सिंगल इंजिन असेलले तेजस मार्क 1A मिग-21 लढाऊ विमानांची जागा घेईल. हिंदुस्थानी हवाई दलाची लढाऊ स्क्वॉड्रनची संख्या 42 वरून 31 झाल्यामुळे ही लढाऊ विमाने सामील करण्याचा विचार हिंदुस्थानी वायुसेना करत आहे. मिग-21 विमान 26 सप्टेंबर 2025 रोजी निवृत्त होणार आहे. या विमानाने 1971 चे युद्ध, कारगिलचे युद्ध तसेच इतर अनेक प्रमुख मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.