Latur News – शेतावर गेले ते घरी परतलेच नाहीत, दोन दिवसांनी पवनचक्कीसाठी खोदलेल्या खड्ड्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

शेतात पवनचक्कीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील नागरसोगा येथे ही घटना घडली. राजकुमार शेषराव अडसुळे (45) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी औसा पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश गवळी हे करीत आहेत.

राजकुमार अडसुळे हे मंगळवारी शेतावर गेले होते. मात्र सायंकाळ झाली तरी ते शेतावरून घरी परतले नाहीत. यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली असता त्यांची मोटारसायकल, चप्पल आणि डिक्कीमध्ये मोबाईल आढळून आला. बराच वेळ शोध घेऊनही ते सापडले नाहीत. पुन्हा बुधवारी दिवसभर त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत.

अखेर गुरुवारी पवनचक्कीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. याबाबत औसा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर नागरसोगा येथील स्मशानभूमीत मयत राजकुमार अडसुळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेमुळे अडसुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.