धीर सोडू नका, शिवसेना सोबत आहे! उद्धव ठाकरे यांचा अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शब्द… बांधावर जाऊन जाणून घेतल्या व्यथा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला. लातूर, धाराशीव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा दौरा करत उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. धीर सोडू नका, शिवसेना सदैव तुमच्या सोबत आहे, शेतकऱ्यांना हक्काची मदत देण्यास सरकारला भाग पाडू, कर्जमुक्तीसाठीही पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्त मराठवाडय़ाचा दौरा केला. लातूर येथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. लातूरमधील काटगाव येथे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. शेतीचे आणि घरांचे किती नुकसान झाले याची माहिती घेतली.

धाराशीव जिल्ह्यातील इटकूर गावात उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच शेतकऱ्यांनी त्यांना भेटून आपल्यावर आलेल्या घोर संकटाची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी आपुलकीने शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतीत काहीच राहिले नाही. जनावरांना द्यायला चाराही राहिला नाही. सर्वच वाहून गेले. लेकरांच्या वह्या-पुस्तकेही वाहून गेली. घरात चिखल झालाय. आम्ही रानात राहतोय, असे भयंकर वास्तव यावेळी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले. आता माझ्या हातात तुम्हाला द्यायला काही नाही माझा नाइलाज आहे. मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, पण सरकारकडून तुमच्या हक्काची मदत शिवसेना मिळवून देईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.

कळंब तालुक्यातील इटकूर गावात शीलाताई मोरे यांच्या घरात पूराचे पाणी शिरले होते. उद्धव ठाकरे यांनी त्या घराची पाहणी केली. कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. बळीराजाचा आनंद अस्मानी संकटाने हिरावून घेतलाय, तो पुन्हा मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव बळीराजासोबत राहील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिला. कळंब तालुक्यातील लोहटा येथेही उद्धव ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना संबोधित केले. लातूरमधील तांदळे गावात शेतकऱ्यांनी दिलेली निवेदने स्वीकारत ती सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. लातूरच्या कडगाव येथेही त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेलेय, पण शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. शिवसेना आणि शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने या संकटकाळात शेतकऱ्यांसोबत उभे आहेत, शेतकऱ्यांच्या मागण्या शिवसेना सरकारकडे लावून धरेल आणि त्या मान्य करून घेईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

सरकारने मदत जाहीर केली आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोचतेय की नाही याकडे शिवसेनेचे बारीक लक्ष राहील. तसेच एकरी 50 हजार रुपये मिळावे ही शेतकऱ्यांची मागणीही लावून धरू. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी यासाठी प्रयत्न करू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. पीके उद्ध्वस्त झाली आहेत. शेती खरवडून गेली आहे. ती पूर्ववत करण्यास तीन ते पाच वर्षे लागतील. त्यासाठी मोठा खर्चही करावा लागेल. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याला मिळायला हवी. माझ्या हातात काही नाही, पण कोणत्याही परिस्थितीत शिवसेना बळीराजावर अन्याय होऊ देणार नाही, असे अभिवचन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले.

पूरग्रस्तांना मदत करणारे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि शिवसैनिकांचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख संतोष सूर्यवंशी आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख आदी उपस्थित होते.

मदत देताना अधिकाऱ्यांनी आडमुठेपणा केला तर त्यांना सरळ करू

मदत देताना वेडेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी आडमुठेपणाने वागत असतील तर त्यांना सरळ करण्याची हिंमत दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्यांना त्यांना हक्काची मदत मिळवून द्यावीच लागेल, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. बॅंकेच्या कर्जवसुलीच्या नोटिसा शेतकऱ्यांना आल्या आहेत, त्या सगळय़ा एकत्र करून शिवसेनेकडे द्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवू आणि ते कर्ज आता सरकारनेच भरावे असे सांगू, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. बॅंकांनी नोटिसा थांबवल्या नाहीत तर त्यांची होळी करावी लागेल, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

दोन मेंढपाळांना मदतीचा हात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील रजापूर शिवारातील नुकसानीची पाहणी केली. आत्महत्या केलेल्या सोनू मोहन गोर्डे या मयत शेतकऱ्याच्या घरी जाऊन उद्धव ठाकरे यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. नंतर पिवळ्या पडलेल्या सोयाबीन आणि आडव्या झालेल्या ऊसाची पाहणी केली. पंथेवाडी शिवारात मुसळधार पाकसाच्या पाण्यात रहाटगाव येथील मेंढपाळ अंबादास खोलासे व मल्हारी डोईफोडे यांचे पशुधन वाहून गेले होते. बैल, मेंढय़ा, बोकडे व कोकरू असे 61 जनावरे मृत्युमुखी पडली. तहसील प्रशासनाने पंचनामा केला. शल्यचिकित्सा झाल्यावरच नुकसानभरपाई दिली जाते. असा नियमांचा पाढा महसूल प्रशासनाने वाचला. त्यामुळे दोन्ही मेंढपाळ हताश झालेले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर ही व्यथा मांडली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तत्काळ या मेंढपाळांना शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदतीचा हात दिला.

बँकांच्या नोटिसा शिवसैनिकांकडे सोपवा

मराठवाडा नैसर्गिक आपत्तीशी झुंजत असताना शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी बँकांच्या नोटिसा आल्या आहेत. हा नतद्रष्टपणाच आहे. या नोटिसांना घाबरू नका. या नोटिसा शिवसैनिकांकडे सोपवा, त्या मुख्यमंत्र्यांना पाठवून देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पंचनामे नीट होतील हे बघा. अधिकारी आडमुठेपणाने वागत असतील तर शिवसेना त्यांना सरळ करेल, असा दमही त्यांनी भरला.

तुम्हीच मुख्यमंत्री हवे आहात

बीड जिल्हय़ातील कुर्ला येथे व्यथा मांडताना शेतकरी भावुक झाले. ‘साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असताना दोन लाखांची कर्जमाफी झाली होती, हे सरकार काही देत नाही आणि दिलं तरी अटीशर्तींमध्ये अडकवतं. तुमच्याशिवाय महाराष्ट्र पोरका आहे. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हा’ असे काही शेतकरी म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधी या संकटातून बाहेर या, आम्ही तुमच्या सोबत आहोत असा शब्द दिला.

पंतप्रधान मराठवाडय़ात या, आक्रोश बघा

सध्या जीएसटीचा उत्सव सुरू आहे. पंतप्रधानांना माझे आवाहन आहे, हा उत्सव सोडा आणि मराठवाडय़ात येऊन शेतकऱ्यांचा आक्रोश बघा. मराठवाडा अतिवृष्टीने हवालदिल झाला आहे. त्याला आता मदतीची गरज आहे. पंतप्रधानांनी मराठवाडय़ाचा दौरा केलाच पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

हात जोडतो… वेडंवाकडं पाऊल उचलू नका!

सोलापूरच्या बार्शीमध्ये शरद धमके नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्यावर वीस लाखांचे कर्ज होते. या घटनेचा दाखला देत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना म्हणाले की, कुणीही अस्मानी संकटामुळे खचून जाऊ नका. धीर सोडू नका. वेडंवाकडं पाऊल उचलू नका. तुमच्यावर तुमचे कुटुंब अवलंबून असते. कृपा करून आत्महत्या करू नका. वाईट दिवस जातात. हेही दिवस जातील, अशी कळकळीची विनंती उद्धव ठाकरे यांनी केली.

शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेलेय, आता मदतीसाठी पंचांग पाहणार का? सरकारला संतप्त सवाल

पुरात संसार आणि शेती वाहून गेली. शेतकऱ्यांच्या डोळय़ात फक्त अश्रू उरले आहेत. तरीही अद्याप सरकारकडून मदत पोहोचलेली नाही. ही भयाण परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे महायुती सरकारवर संतापले. पिकांसोबत शेतकऱ्यांचे आयुष्य पुरात वाहून गेल्याचे वास्तव डोळय़ासमोर असतानाही निष्ठgर महायुती सरकार पंचनाम्याची वाट पाहतेय, दर वेळेला योग्य वेळी करू असे आश्वासन सरकार देते, मग ती वेळ कधी येणार, आता मदतीसाठी पंचांग पाहणार का? सरसकट मदत का केली जात नाही? असा संतप्त सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, त्यांना कर्जमुक्ती द्या, अशी मागणी त्यांनी केली.