मिग- 21 ला भावुक निरोप! 62 वर्षांच्या शानदार सेवेनंतर हवाई दलातून निवृत्त, चंदीगडमध्ये रंगला भव्य फेअरवेल सेरेमनी

मिग-21 हे लढाऊ विमान 62 वर्षांच्या शानदार सेवेनंतर आज हिंदुस्थानच्या हवाई दलातून निवृत्त झाले. हवाई दलाच्या चंदीगड विमान तळावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान आणि हवाई दल प्रमुख एपी सिंग यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मिग-21 ला निरोप देण्यात आला. आकाश गंगा शो, ढगांची रचना, डॉगफाइट्स आणि वॉटर सॅल्यूटने यावेळी वातावरण भावुक झाले. 1965 पासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंतच्या शौर्याची गाथा यावेळी सांगितली गेली. आता मिग-21 ची जागा तेजस लढाऊ विमान घेईल.

निरोप समारंभात सुरुवातीला मिग-21 विमानांनी आकाशात उड्डाण केले. एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी स्वतः बादल फॉर्मेशनमध्ये सोलो उड्डाण केले. एअर वॉरियर ड्रिल टीमने एक सजवलेली ड्रिल सादर केली. यासह मिग-21 विमानांनी लढाऊ कौशल्य दाखवत आपली शक्ती दाखवली. अखेरीस सहा मिग-21 विमानांना वॉटर कॅनन सल्यूट देण्यात आला.

हिंदुस्थानच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नात मिग-21 चा वारसा जिवंत राहील. हे विमान धैर्य, शिस्त आणि देशभक्तीचे प्रतीक आहे. हे विमान एलसीए-तेजस आणि आगामी अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) सारख्या स्वदेशी प्लॅटफॉर्मच्या विकासाला प्रेरणा देईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.