
मध्य रेल्वेवरील सर्वात गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून लोकलसह मेल, एक्स्प्रेस गाडय़ा सुटतात. त्यामुळे या स्थानकात प्रवाशांची चोवीस तास वर्दळ असते. मात्र सीएसएमटी स्थानकातील पुनर्विकास कामानिमित्त सुमारे 80 दिवस फलाट क्रमांक 18 बंद केला जाणार आहे. रेल भूमी विकास प्राधिकरण (आरएलडीए) मार्फत सुरू असलेल्या सीएसएमटी येथील पुनर्विकास कामानिमित्त 1 ऑक्टोबर ते 19 डिसेंबरपर्यंत सीएसएमटी येथील फलाट क्रमांक 18 वर ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत फलाट क्रमांक 18 वर पायाभूत कामे करण्यासाठी सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याची कामे हाती घेतली आहेत. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असून बाहेरगावी जाणाऱ्या आणि बाहेरून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची गर्दी अधिक असते; परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठा ब्लॉक घेण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होईल. रेल्वेगाडी पकडण्यासाठी आणि इच्छित डबा पकडण्यासाठी धावपळ होण्याची शक्यता आहे.