
अभिनय सोडून राजकारणाच्या आखाडय़ात उतरलेला तामिळ सुपरस्टार थलपती विजय याच्या नव्या पक्षाच्या जाहीर सभेत शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 36 जणांचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक लोक जखमी झाले. मृतांमध्ये आठ मुले व 16 महिलांचा समावेश आहे.
तामीळनाडूत पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणूक होणार आहे. विजयचा तमिलगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षही निवडणुकीच्या मैदानात आहे. या पक्षाने शनिवारी करूर येथे सभेचे आयोजन केले होते. सभेला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. विजयने भाषण सुरू केल्यानंतर गर्दी वाढत गेली. सुपरस्टार विजयला जवळून पाहण्यासाठी चाहते स्टेजच्या दिशेने सरकू लागले. त्यातून धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाली.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ‘जखमींना सर्व प्रकारची वैद्यकीय मदत देण्याचे आदेश त्यांनी सरकारी अधिकारी व संबंधित मंत्र्यांना दिले.
गर्दीचा रेटा इतका होता की…
चेंगराचेंगरी झाल्याचे समजताच विजयने भाषण अर्ध्यावरच थांबवले आणि पोलिसांना मदतीचे आवाहन केले. मात्र गर्दीचा रेटाच इतका होता की अभूतपूर्व गोंधळ उडाला. काही वेळातच घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. काही कार्यकर्त्यांना विजयने स्वतः मदत केली. पाण्याच्या बाटल्या दिल्या.