
>> कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन
भारतीय वायुसेना आणि मिग 21 मध्ये एक ऐतिहासिक अतूट नाते होते. जवळपास प्रत्येक भारतीय फायटर पायलटची कारकीर्द मिग 21 उड्डाणांनीच सुरू झाली आणि तब्बल 17 वायुसेनाध्यक्ष चीफ बनण्यापूर्वी त्याच्याच कॉकपिटमध्ये बसले होते. या विमानाचा जागतिक दरारा एवढा होता की, अमेरिकेच्या ‘एफ’ प्रणालीची सर्व लढाऊ विमाने मिग 21 ला तोंड देण्यासाठी विकसित करण्यात आली, असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. आता भारतीय वायुसेनेतील मिग 21 विमाने 26 सप्टेंबर 2025 रोजी निवृत्त करण्यात आली. 2026 च्या शेवटपर्यंत सर्व विमाने सेवानिवृत्त होतील. धिस इज ए टियरफूल फायनल सॅल्युट टू दॅट प्राउड पिस ऑफ स्टील…!
मिग 21 ची कहाणी 1950 च्या दशकाच्या सुरुवातीला सोव्हिएत युनियनच्या हिमबाधा झालेल्या हँगर्समध्ये सुरू झाली. जेव्हा शीतयुद्ध पेटत होते आणि हवाई वर्चस्व हे अंतिम बलस्थान होते. आर्टेम मिकोयन आणि मिखाईल गुरेविच यांच्या नेतृत्वाखालील मिकोयन गुरेविच डिझाइन ब्युरोला यशस्वी मिग-15, मिग-17 आणि मिग-19 जेट्सचा उत्तराधिकारी तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. चीनने रिव्हर्स इंजिनीअरिंग करून त्याचे ‘चेंगडू जे 7’ व्हर्जन तयार केले. चीन आणि पाकिस्तानशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने 1961 मध्ये मिग 21 खरेदी केले. एफ-104 स्टारफायटरसारख्या पाश्चात्य पर्यायांचे मूल्यांकन केल्यानंतर भारताने सोव्हिएत जेटची निवड त्याच्या उत्कृष्ट कामगिरी आणि संभाव्य तंत्रज्ञान हस्तांतरण फायद्यांसाठी केली. पहिली सहा मिग 21 एफ13 विमाने 1963 मध्ये आली आणि भारताने सुपरसॉनिक युगात प्रवेश केला. मिग 21यू मंगोल/66 व 69, मिग 21एफएल 77/मिग 21बिस 75 विमाने हा एकेकाळी भारतीय वायुसेनेचा मुख्य आधार होता. हे विमान पूर्वाश्रमीच्या सोव्हिएट युनियनमध्ये विकसित झाले असले तरी त्याचे संपूर्ण आयुष्य भारतीय वायुसेनेच्या सेवेत गेले. 1960च्या दशकात आवाजी अडथळा (साऊंड बॅरियर) तोडणारे हेच पहिले विमान होते.
मिग 21 विमानांनी भारतीय वायुसेनेला लवचिकता शिकवली.त्याच्या डेल्टा पंखांपासून ते आफ्टरबर्नरवरील गर्जनेपर्यंत हे विमान जणू एक गतिमान कविता होती, जिने भारताचा संरक्षण कणा बळकट बनवला. मिग 21 लढाऊ विमानांवर भारतीय वायुसेनेची भिस्त, सामारिक पसंतीबरोबरच काळाची गरजही होती, असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. त्या काळात लढाऊ विमानांची आयात केली जात असे. कारण त्याचा स्वदेशी विकास शक्य नव्हता. त्यामुळे या सोव्हिएट अॅनॉलॉग प्लॅटफॉर्मभोवताली आपली रणनीती गुंफण्याशिवाय वायुसेनेकडे दुसरा पर्याय नव्हता मिग 21 विमाने भारतीय वायुसेनेत दाखल झाल्यावर दोनच वर्षांनी 1965च्या द्वितीय भारत-पाक युद्धात त्याची कसोटी लागली. भारतीय वैमानिकांनी, आवाजी वेगाच्या तीन पटीत उड्डाण करणाऱया मिग 21 विमानांच्या एअर पेट्रोलिंगद्वारे अमेरिकन एफ-4 विमानांमधील पाक वैमानिकांचा धुव्वा उडवला. पूंछ, मंडीयाल, अखनूर, जम्मूपासून अंबालापर्यंतच्या आकाशावर भारतीय वैमानिकांचेच राज्य होते. असे असले तरी या युद्धात प्रशिक्षित वैमानिकांच्या कमतरतेमुळे मिग 21चा हवा तसा परिपूर्ण वापर होऊ शकला नाही. पण जी विमाने युद्धात उतरली त्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन मोठय़ा संख्येत ही विमाने घेण्याचा निर्णय झाला. 1969 पर्यंत भारताकडे 120 मिग 21 विमाने आली. 1971 च्या तिसऱया भारत-पाक युद्धाच्या वेळी अत्याधुनिक मशिनगन्स असलेल्या पाकिस्तानी एफ 104 विमानांची दहशत होती, पण भारतीय वैमानिकांचे उत्तम प्रशिक्षण आणि मिग 21 विमानांच्या प्रतिभेद शक्तीच्या नेमक्या वापराद्वारे याच विमानांनी मोठी मर्दुमकी गाजवून पाकिस्तानच्या चार एफ 104, दोन एफ 6, एक एफ 86 सेबर विमान आणि एक लॉकहीड सी130 हर्क्युलस अशा आठ विमानांचा धुव्वा उडवत सर्वोच्च भारतीय हवाई शक्तीला उजागर केले होते.1999 मधील पाकिस्तानच्या घुसखोरीमुळे चौथे भारत-पाक युद्ध झाले. या कारगील युद्धातही मिग21 चा वापर केला गेला. पाकिस्तानी रॉकेट लाँचरद्वारे एक मिग नष्ट झालं तरी दुसऱया मिग 21 ने हवेतून हवेत मारा करणाऱया क्षेपणास्त्राद्वारे, पाकिस्तानी नौसेनेचे ब्रिगेट अटलांटिक विमान पाडले होते.
जसजसा काळ गेला तसतसे भारतीय वायुसेनेत मिराज 2000, सुखॉय 30, रॅफेल आणि आता येऊ घातलेले तेजस यांच्यासारखी नवी विमाने दाखल झाली, पण मिग 21 विमानांचे महत्त्व कमी झाले नाही. इतर विमानांसोबत मिग 21 विमानांनी कारगिल आणि बालाकोट हल्ल्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतर पूंछमध्ये झालेल्या पाक हवाई हल्ल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग 21 विमानानेच पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पाकिस्तानचे एफ 16 विमान पाडले. पाक विमानभेदी तोफांनी त्यांच्या मिगला नष्ट केले ही बाब अलाहिदा. ते भारतीय मिगचे शेवटचे भक्ष्य (लास्ट किल) होते. 2025 च्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधेही मिग 21 होते, पण ते रियरमधील हवाई संरक्षणासाठी वापरण्यात आले होते. काही/अनेक त्रुटी आणि वाद असूनही मधल्या काही वर्षांत सततच्या अपघातांमुळे या ऐतिहासिक विमानांच्या नशिबी ‘ उडती शवपेटी’ अशी संभावना आली. तरीही मिग-21 भारताच्या हवाई युद्ध इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. इतर कोणतेही सुपरसॉनिक विमान मिग 21ची उत्पादन संख्या, जागतिक उपस्थिती किंवा हवाई युद्धातील परिणामांशी आजतागायत तुल्यबळ होऊ शकलेले नाही. शीतयुद्धातील संघर्ष ते आधुनिक चकमकीपर्यंत वेग आणि साधेपणा आकाशातील शक्तीचे संतुलन करू शकतो हे मिग 21ने सिद्ध केले. भारतात आजच्या त्याच्या अधिकृत निवृत्तीनंतर मिग-21 चा महान अध्याय संपेल, परंतु जगातील सर्वाधिक उत्पादित सुपरसॉनिक विमान म्हणून त्याचा वारसा सुरक्षित राहील आणि तो कधीही विस्मरणात जाण्याची शक्यता नाही. मिग 21 विमाने निवृत्त झाली. त्याच्या छत्रछायेत पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान, श्रीलंका आणि कारगीलमध्ये लढलेला माझ्यासारखा माजी सैनिक या विमानांना एकच सांगू इच्छितो की, ‘जा मित्रा जा…उंच भरारी घेत जा, पण गेलास तरी तू आमच्या मनात सदैव असशील!’
n चीन आणि पाकिस्तानशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने 1961 मध्ये मिग 21 खरेदी केली. त्या विमानात पहिल्यांदा उड्डाण करणारे नवथर वैमानिक इंजिन आणि आफ्टर बर्नर्स सुरू होऊन विमानांनी आकाशात भरारी घेतल्यानंतर त्याच्या शक्तीप्रदर्शनाने दिपून जात असत. कालांतराने हवेत स्टीफ क्लाइम्ब, हार्ड बँक, बॅरल रोल इत्यादि हवाई कसरती (अॅरोबॅटिक्स) लीलया करून अलगद धावपट्टीवर उतरणाऱया या वैमानिकांच्या चेहऱयावर विजयश्रीची झलक दिसत असे. कारण ते आता नवथर नसून आकाश योद्धय़ांमध्ये (वॉरियर्स ऑफ स्काय) परिवर्तित झालेले, कुठल्याही विमानाला तोंड देऊ शकणारे, जाँबाज वैमानिक बनलेले असत.