
अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक वाहून गेले, शेतजमिनी खरवडून गेल्या आहेत. हाता-तोंडाशी आलेला घासही गेला. राज्यातील शेतकरी मदतीसाठी आक्रोश करत असताना दुसरीकडे देशाचे गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचा दौरा मोठ्या थाटामाटात आयोजित केला गेला आहे.
अमित शहा ४ ऑक्टोबरला म्हणजेच येत्या शनिवारी शिर्डीत दाखल होणार आहे. तर, कोट्यवधी रुपयांचा खर्च करून ५ तारखेला रविवारी त्यांच्या उपस्थितीत अनेक उद्घाटने व प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा परिसरामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. शासकीय यंत्रणा या सोहळ्याच्या तयारीत रात्रंदिवस गुंतली आहे. महाराष्ट्र दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा, त्यांच्या जखमा पाहण्याचा आणि धीर देण्याचा अमित शहांचा एकही कार्यक्रम नाही. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी वेळ नाही, मग असा दिखावा का? जनतेच्या पैशांचा असा उधळपट्टीचा कार्यक्रम का? असे प्रश्न सामान्यांमधून उपस्थित केले जात आहेत.