
खूप काम केले थोड फिरून येतो, असे घरच्यांना सांगून तो मुंबई गाठायचा. मग संधी मिळेल तेव्हा छोट्या मंदिरांना टार्गेट करून मंदिरातले सोने-चांदीचे साहित्य चोरायचा. अशा प्रकारे गुन्हे करून झटपट पैसा कमावणाऱ्या राजस्थानातील एका तरुण सोनाराला लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कपिल सोनी असे आरोपीचे नाव आहे. दक्षिण मुंबईतील मंगलदास मार्केट परिसरातील एका मंदिरातून शिवलिंग व पूजेचे आभूषण असे मिळून तीन लाख किमतीची तीन किलो चांदी चोरीला गेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक नितीन तडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भंडारे तसेच कांबळे, सानप व वाकचौरे या पथकाने तपास सुरू केला. खबरे यांच्या मदतीने कसून तपास करूनही चोराचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता.
अखेर बरीच मेहनत घेतल्यानंतर एक संशयित आढळून आला. त्याचा अंधेरी, मुंबई सेंट्रल, बोरिवली असा माग काढत पोलीस राजस्थानपर्यंत पोहोचले. मग आरोपी कोण हे स्पष्ट झाल्यानंतर जोधपूर पोलिसांच्या मदतीने कपिल सोनी या तरुण सराफाला उचलले. चौकशीत त्याला काही व्हिडीओ क्लिप दाखवल्यानंतर आधी तो मी नव्हे म्हणणाऱ्या कपिलने गुह्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन गुह्यांची उकल करत मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.