
बलात्कार केल्यानंतर सहा वर्षांनी पीडितेसोबत विवाह करणाऱ्या आरोपीचा गुन्हा रद्द करण्यास पीडितेच्या वडिलांनी विरोध केला. त्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने या आरोपीचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. फैजल शेख असे या आरोपीचे नाव आहे. शेखविरोधात पुणे पोलिसांनी अल्पवयीन पीडितेवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. याचे आरोपपत्र दाखल झाले आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करत शेखने याचिका दाखल केली. न्या. अजय गडकरी व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
शेखचा गुन्हा रद्द केल्यास माझ्या मुलीचे आयुष्य धोक्यात येईल. त्यामुळे त्याचा गुन्हा रद्द करू नये, अशी विनंती पीडितेच्या वडिलांनी केली. ती मान्य करत न्यायालयाने शेखची याचिका फेटाळून लावली.
हेतू संशयास्पद
घटनेच्या सहा वर्षांनी शेखने पीडितेसोबत विवाह केला. विवाहानंतर गुन्हा रद्द करण्यासाठी त्याने याचिका केली. शेखचा हेतू संशयास्पद असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
पीडितेने संमती मागे घेतली
हा गुन्हा रद्द करण्यासाठी पीडितेने संमती दिली होती. तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. मात्र शेखने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे ही संमती मागे घेतली जात आहे, असे पीडितेने न्यायालयात स्पष्ट केले.
खटला सुरू होताच केले लग्न
शेखने पीडितेवर अत्याचार केला. त्यावेळी पीडिता अल्पवयीन होती. नंतर पीडिता गरोदर राहिली. तिला सहा वर्षांची मुलगी आहे. खटल्याची प्रक्रिया सुरू होताच शेखने पीडितेसोबत विवाह केला. लगेचच गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली. गुन्हा रद्द झाल्यास मुलीला धोका होऊ शकतो, असा दावा पीडितेच्या वडिलांनी केला.