अन्याय दिसेल तिथे ढुंगणाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे, उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत घेतला भाजपचा समाचार

जिथे-जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाथ मार हे माझ्या आजोबांनी शिकवलेलं ब्रिद वाक्य माझ्या वडिलांनी ते आयुष्यभर पाळलं, तेच घेऊन मी पुढे चाललोय. अगदी काही फुटबॉलपटू होण्याची गरज नाहीये की जिकडे-तिकडे लाथ मारत फिर. पण अन्याय दिसेल तिथे ढुंगणाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत भाजपचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आजच्या राजकारणामध्ये आणि आजच्या पत्रकारितेमध्ये अनेकजण पत्रकार म्हणून सामनामध्ये त्यांनी सुरवातीचे धडे घेतले. आणि मग इकडे तिकडे गेले. त्यातले काही तुमच्यासारखे आजही एक कृतज्ञतेची भावना ठेवून आमच्या वागत असतात. राजकारणातही तेच आहे. राजकारणासुद्धा अनेकजण शिवसेनेमध्ये तयार झाले. बोलता बोलता तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला. ठाकरे ब्रँड हा काही आताच जन्माला आलेला नाही. तो गेल्या पाच-सहा पिढ्यांपासूनचा महाराष्ट्राला परिचित असलेला ब्रँड आहे. पण ठाकरे ब्रँड ज्यांनी अधिक नावारुपाला आणला अर्थात माझे आजोबा आणि त्याच्यानंतर माझे वडील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि अभिमानाने सांगेत की त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यामध्ये झालेला. त्यामुळे भाईयो और बहनो आपका और मेरा बहोत पुराना रिश्त है, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

पुण्याला एक वेगळी परंपरा आहे. पुणं हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं की जात होतं? कारण आता सगळीकडे मुंबई काय पुणे काय सगळी माहेरघरं ही बिल्डरांची झालेली आहेत. तरीदेखील पुण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळेपण नक्कीच आहे. आणि पत्रकार म्हटल्यानंतर आपण थेट टिळक आणि आगरकरांची आठवण काढतो. आता खरंच ती पत्रकारिता राहिली आहे का? नाही म्हटलं तरी मी सुद्धा सामनाचा संपादक आहे. कार्यकारी संपादक संजय राऊत समोर बसले आहेत. आमचे अरूण निगवेकर इथे आहेतच म्हणून मी थोडसं बोलू शकतो. तर आपल्याला तो अधिकार राहिला आहे का? की तो आपण गमावलेला आहे? कारण जेव्हा-जेव्हा आपण पत्रकारितेचा उल्लेख करतो तेव्हा टिळक आणि आगरकर. पण त्यांच्याकडून आपण काय घेतलेलं आहे. आज आपली ताकद आहे का? की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? आपल्या सरकारला विचारण्याची ताकद आणि हिंमत आपण ठेवलीय की हरवून बसलेलो आहोत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

शिवसेनेचा दसरा मेळावा अभूतपूर्व झाला. अभूतपूर्व हे केवळ माझं श्रेय नाही तर कोसळणाऱ्या पावसामध्ये एकतर शिवाजी पार्कमध्ये तळं झालं होतं. आणि त्याही चिखलात केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आला होता. अबालवृद्ध, महिला आल्या होत्या. स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते. कारण आपल्याकडे बिर्याणी वैगरेची काही सोय नाही. जे येतोत ते स्वकष्टाचं असतं असे सगळे शिवसैनिक आलेले. पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जागचं हललं नाही. शिवाजी पार्कला दरवाजे नाहीत. बांधावरून उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आलेल्यांना कोंडून ठेवण्याची गरज आम्हाला कधी वाटली नाही. जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषणं सुरू झाल्यावर दरवाजे बाहेरणं बंद करतात. तशी काय आम्हाला गरज कधी वाटली नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मिंधेंचा समाचार घेतला.

मृत्युनंतरही बाळासाहेबांची विटंबना करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल, संजय राऊत यांचा रामदास कदम यांना इशारा

शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा जेव्हा झाला १९६६ ला. मी अर्थातच सहा वर्षांचा होतो. येता-जाताना सर्व हालचाली बघत होतो. घरी गर्दी होतेय, शिवसैनिक येताहेत. आणि मग सभा कुठे घ्यायची? त्या चर्चेत मी सहभागी नव्हतो. पण या आठवणी शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी ठरवलं की पहिली सभा घ्यायची? कुठे घ्यायची? शिवसेनाप्रमुख म्हणाले शिवाजी पार्कला. सगळे त्यांचे मित्रमंडळी होते आणि आजूबाजूचे लोक होते ते म्हणाले तुम्हाला काय वेड लागलंय का? शिवाजी पार्क पाहिलंय का किती मोठं आहे? जरा पहिली सभा छोट्या हॉलमध्ये घ्यायला पाहिजे. नंतर एक मैदान बघू आणि असं करता करता जेव्हा आपल्याला वाटेल अंदाज येईल तेव्हा शिवाजी पार्कला घेऊ. तेव्हा बाळासाहेबांनी ताडकन सांगितलं की मी पहिली सभा शिवाजी पार्कला घेईन. बघू कोण वेडं आहे मी वेडा आहे का लोकं वेडी आहेत? आणि आता कालांतरने कळतंय की दोन्ही वेडे नव्हते. दोघंही व्यवस्थित ठरवून त्यावेळा एक दिशा ठरवली त्या दिशेने तो प्रवास मला अभिमान वाटतोय की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. आणि त्याच जिद्दीने पाऊस समोर दिसत असताना सुद्धा मी संजय आणि माझे शिवसेनेचे दोनचार नेते आम्ही बोलत होतो कुठे घ्यायचा? तर आम्ही म्हटलं परंपरा आहे आपली शिवाजी पार्क. हॉलमध्ये कसा घेणार? आणि शिवाजी पार्कला मेळावा घेतला. ही माझ्या शिवसेनेची परंपरा आहे. त्या मेळाव्यात मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला? कितपत मला जमलं असेल कारण पाऊस होता. समोर लोकं भिजत होती. कितपत जमलं कल्पना नाही मला. पण माझा प्रयत्न हा आहे, होता आणि राहणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लडाखमध्ये काय परिस्थिती आहे? लेह लडाख खरंच शांत झालं आहे का? आसाममध्ये आदिवासी रस्त्यावर उतरले आहेत. हातामध्ये मशाली आहे. मणिपूरमध्ये आज काय चाललंय कोणाला कुठे माहिती? देशात इतरत्र काय चाललंय आपण बातम्याच देत नाही, मग खरंच आपण टिळक आणि आगरकराचं नाव घेण्याच्या लायकीचे आहोत का? हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मी माझ्या परिने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो करत राहणार. कारण त्याला आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा. जे समोर दिसतंय जिथे-जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाथ मार हे माझ्या आजोबांनी शिकवलेलं ब्रिद वाक्य माझ्या वडिलांनी ते आयुष्यभर पाळलं, तेच घेऊन मी पुढे चाललोय. अगदी काही फुटबॉलपटू होण्याची गरज नाहीये की जिकडे-तिकडे लाथ मारत फिर. पण अन्याय दिसेल तिथे ढुंगणाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.