
पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबई गाठणे कमी वेळेत शक्य होणार आहे. आरे ते कफ परेडदरम्यानची भुयारी मेट्रो मार्गिका येत्या 8 ऑक्टोबरला पूर्णपणे खुली होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुयारी मेट्रोच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण केले जाणार आहे. त्यानंतर मेट्रोमधून मुंबई विमानतळाहून कफ परेडला अवघ्या 45 मिनिटांत पोहोचता येणार आहे.
‘अॅक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-3 मार्गिकेवर सध्या वरळीच्या आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंत प्रवासी सेवा सुरू आहे. पुढील मार्गिकेवरील वरळी सायन्स म्युझियम स्थानक ते कफ परेडपर्यंतच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या अंतिम टप्प्यातील 11 भूमिगत स्थानकांवरील प्रवासी सेवा 8 ऑक्टोबरला खुली होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) या भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम केले असून प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जिका) आणि केंद्र सरकारने निधी पुरवठा केला आहे. ही मार्गिका पूर्णपणे खुली झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील नागरिकांना दक्षिण मुंबईतील मंत्रालय, विधान भवन आदी विविध सरकारी कार्यालयांत जाणे सोयिस्कर ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन अशा स्थानकांमुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान बनण्याची चिन्हे आहेत.
मेट्रो-3 ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका आहे. या मार्गिकेवर आरे ते कफ परेडदरम्यान एकूण 26 भूमिगत मेट्रो स्थानके आहेत. वेगवान आणि आरामदायी प्रवास घडवणाऱ्या या मेट्रोच्या प्रवासात महिला, वृद्ध नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी राखीव आसनांची व्यवस्था केली आहे. तसेच सुरक्षित प्रवासासाठी मेट्रो स्थानकांच्या इमारतींसह ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच आहे.