हिमवादळामुळे माऊंट एव्हरेस्टवर शेकडो ट्रेकर्स आणि गिर्यारोहक अडकले, बचाव पथक आणि स्थानिकांनी जीव वाचवला

तिबेटच्या उतारावर अचानक आलेल्या हिमवादळामुळे माऊंट एव्हरेस्ट परिसरात शेकडो ट्रेकर्स आणि गिर्यारोहक अडकले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम बचाव पथक आणि स्थानिकांनी केले. मुसळधार बर्फवृष्टी आणि पावसामुळे हिमालयातील परिस्थिती बिकट आहे. हवामान खात्याने हिमवादळाची शक्यता वर्तवलेली नव्हती. मात्र शुक्रवारी संध्याकाळपासून अचानक बर्फवृष्टी सुरू झाली आणि थोड्याच वेळात पूर्ण परिसर बर्फाच्या कठीण कवचात अडकला. तब्बल 16,000 फूट (4,900 मीटर) उंचीवर हा सारा प्रकार घडल्यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने हालचाली करत सुमारे 350 जणांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यांना जवळील कुदांग गावात तात्पुरत्या निवासात ठेवण्यात आले आहे. मात्र अजूनही शेकडो ट्रेकर्स बर्फात अडकलेले असल्याचे समजते. तिबेटमधील ‘ब्लू स्काय रेस्क्यू टीम’सह अनेक स्थानिक संस्था बचाव कार्यात गुंतल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनीही हातभार लावला आहे.
या भागात थंडी इतकी प्रचंड आहे की, ट्रेकर्सचे तंबू उडून गेले असून अनेकांना हायपोथर्मियासारख्या गंभीर अवस्थेला सामोरे जावे लागत आहे. काहींना श्वास घेण्यास त्रास होतोय, तर काहींना ताप आणि अशक्तपणामुळे हालचालही करता येत नाहीये.

नेपाळच्या सीमेजवळील भागांमध्येदेखील पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. ताज्या माहितीप्रमाणे नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांत पूर आणि दरड कोसळल्यामुळे किमान 47 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर एव्हरेस्ट परिसरात आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.