अमेरिकी कंपनीने शेकडो हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

गेल्या काही महिन्यांपासून टेक्नोलॉजी आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये होत असलेल्या नोकरकपातीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असतानाच आता एका अमेरिकी कंपनीने हिंदुस्थानातील शेकडो कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी कंपनीच्या सीओओने एक व्हर्च्युअल मीटिंग बोलावली. केवळ चार मिनिटे चाललेल्या या मीटिंगमध्ये कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकत आहे, अशी माहिती दिली. कंपनीच्या या निर्णयामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना धक्का बसला.

हिंदुस्थानात राहून वर्क फ्रॉम होम काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना अमेरिकेत बसून सीओओ यांनी एक झूम कॉल मीटिंग अचानक बोलावली. कर्मचाऱ्यांनी रोजच्या प्रमाणे सकाळी 9 वाजता लॉग इन केले. 11 वाजता कंपनीच्या सीओओ यांनी अर्जंट व्हर्च्युअल मीटिंगचा मेल कर्मचाऱ्यांना केला. मीटिंग सुरू होताच सर्व कर्मचाऱ्यांचे लॅपटॉपचे आणि मोबाइलचे कॅमेरे व माइक बंद करण्यात आले. कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सीओओ यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नोकर कपात करण्यात येत असल्याचे सांगितले.

या कर्मचाऱ्यांना नोकरी जाईल, असे अजिबात वाटत नव्हते. मीटिंग संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवण्यात आला. त्यात म्हटले की, तुमचा 1 ऑक्टोबर हा शेवटचा वर्किंग डे होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का बसला. या कर्मचारी कपातीचा कर्मचाऱ्यांच्या परफॉर्म्सशी संबंध नाही, तर कंपनीची कॉस्ट कटिंग आणि इंटरनल रीस्ट्रक्चरिंगचा एक भाग आहे, असे सीओओने स्पष्ट केले.

चार मिनिटांत खेळ खल्लास

कंपनीच्या सीओओ यांनी कर्मचाऱ्यांना मीटिंग घेण्यासंबंधी एक तातडीचा मेल केला. 11 वाजता मीटिंग सुरू झाली आणि 11 वाजून 4 मिनिटांनी मीटिंग संपली. या मीटिंगमध्ये एकाही कर्मचाऱ्याला बोलू दिले नाही किंवा त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. कर्मचाऱ्यांना नोकरीवरून का काढण्यात येत आहे, याची माहिती देणेही कंपनीने टाळले. 1 ऑक्टोबर हा कर्मचाऱ्यांचा शेवटचा दिवस आहे, हे कर्मचाऱ्यांना सीओओकडून कळले. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील कंपन्या मोठी कपात करत आहेत.