न्यूयॉर्क, वॉशिंग्टनसह ट्रम्प यांचे आलिशान घरही इराणी अणुबॉम्बच्या टप्प्यात! नेतान्याहू यांचा नवा दावा

इराण अण्वस्त्र विकसीत करत असल्याचे तसेच त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात समृद्ध युरेनियम असल्याचा दावा करत इस्रायलने इराणवर हल्ला चढवला होता. यात अमेरिकेनेही इन्ट्री घेत इराणमधील तीन अण्वस्त्र केंद्रे उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर शस्त्रसंधीही करण्यात आली होती. आता इस्रायल आणि हमासमध्ये शांतता करारवर चर्चा सुरू असल्याने आखाती देश आणि जगात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलेल्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे.

इराण ८,००० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम असलेली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. या क्षेपणास्त्रांची क्षमता आणखी वाढवली गेली तर अमेरिकन शहरे इराणी अणुबॉम्बच्या रेंजमध्ये येतील, असा खळबळजनक दावा नेतान्याहू यांनी केला आहे. काही सुरक्षा तज्ञांनी दावा केला आहे की इराण वेगाने आयसीबीएम विकसित करत आहे. त्यामुळे अमेरिकेची प्रमुख शहरे लवकरच इराणी अणुबॉम्बच्या रेंजमध्ये येतील.

एका मुलाखतीदरम्यान नेतान्याहू म्हणाले की, इराण ८,००० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेले आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (ICBM) विकसित करत आहे. जर या क्षेपणास्त्रांची श्रेणी आणखी ३,००० किलोमीटरने वाढवली तर न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन सारखी शहरे त्यांच्या टप्प्यात येतील. इतकेच नाही तर मार-ए-लागो देखील अशा क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येईल. मार-ए-लागो हे फ्लोरिडातील पाम बीच येथे स्थित एक आलिशान रिसॉर्ट आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे येथे एक आलिशान घर देखील आहे. १७ एकरात पसरलेले, मार-ए-लागो हे डोनाल्ड ट्रम्प यांचे खाजगी निवासस्थान आहे.

या वर्षी जूनमध्ये, इराणशी युद्ध करणारे इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणच्या शस्त्रास्त्रांच्या महत्त्वाकांक्षेबद्दल अमेरिका आणि जगाला इशारा दिला होता. नोत्यानाहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इराणच्या योजनांबाबत सावध करत इशारा दिला होती की, इराण ८,००० किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. इराणने भविष्यात ही क्षमता आणखी ३,००० किलोमीटरने वाढवली तर त्यांच्याकडे ११,००० किलोमीटरपर्यंत अणुहल्ला करण्याची क्षमता असेल. नेत्यानाहू यांच्या या दाव्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

इराण अण्वस्त्र विकसीत करत नाही. मात्र, युरेनियम समृद्ध करण्यापासून कोणीही त्याला रोखू शकत नाही, असा दावा इराणने अनेकदा केला आहे. इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम मध्य पूर्वेतील सर्वात मोठा आणि सर्वात प्रगत आहे. इराण १९८० पासून यावर काम करत आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) द्वारे चालवला जातो आणि त्यात कमी पल्ल्याच्या ते मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा (MRBM) समावेश आहे. तथापि, विश्वसनीय सूत्रांनुसार, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा विकास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

ICBM हे एक लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र आहे जे ५,५०० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याचे वॉरहेड (अणु, रासायनिक किंवा पारंपारिक) वाहून नेऊ शकते. ते एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे क्षेपणास्त्र त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी पृथ्वीभोवती फिरते. त्यांच्या हायपरसोनिक वेग, अनेक वॉरहेड्स आणि अचूक मार्गदर्शन प्रणालींमुळे ICBM अत्यंत धोकादायक मानले जातात. जर आशियातून प्रक्षेपित केले गेले तर ही क्षेपणास्त्रे अमेरिका आणि युरोपसारख्या दूरच्या लक्ष्यांवर मारा करू शकतात. त्यामुळे इराणच्या या कार्यक्रमामुळे जगाची चिंता वाढली आहे.