
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी परमेश्वर मेश्राम (55) यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान परमेश्वर मेश्राम यांचा मृत्यू झाला. मेश्राम यांच्या मृत्यूला 24 तास उलटूनही नातेवाईकांनी अद्याप मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. जमिनीचा फेरफार जोपर्यंत आमच्या नावावर होत नाही आणि शेतीचा ताबा मिळत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नसल्याची भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे.
फेरफार करण्यास सातत्याने टाळाटाळ होत असल्याने मेश्राम यांनी 26 सप्टेंबर रोजी भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. भद्रावती तालुक्यातील कुरोडा गाव शिवारात परमेश्वर मेश्राम यांची वडिलोपार्जित 8.5 एकर जमीन आहे. या जमिनीबाबत कोर्टात केस सुरू होती. या केसचा निकाल मेश्राम यांच्या बाजूने लागून देखील गेल्या 2 वर्षांपासून तहसील कार्यालयातून त्यांच्या नावे फेरफार करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या मेश्राम यांनी टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील झाली आहे.