एके-630 डिफेन्स गन लष्कराच्या मदतीला, एका मिनिटात 3 हजार गोळ्या बंदुकीतून सुटणार

हिंदुस्थानी लष्कराला लवकरच एके-630 डिफेन्स गन मिळणार आहे. पाकिस्तानी सीमावर्ती भागात असलेल्या धार्मिक स्थळाचे रक्षण करण्यासाठी सहा नवीन एके-630 डिफेन्स गन खरेदी करण्यात येणार आहेत. 30 मिमी मल्टी बॅरल एअर डिफेन्स गन खरेदी करण्यासाठी टेंडर जारी करण्यात आले आहे. हा निर्णय मिशन सुदर्शन चक्रअंतर्गत घेण्यात आल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. 2035 पर्यंत सुरक्षा व्यवस्थेला बहुस्तरीय आणि अधिक स्वदेशी करण्याची योजना आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी पाकिस्तानी लष्कराने जम्मू-कश्मीर आणि पंजाबमध्ये थेट हल्ले केले होते. ज्यात नागरिक आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आले होते. सीमावर्ती भागातील धार्मिक स्थळांची सुरक्षा आणखी कडक करण्यासाठी लष्कराला आता एके-630 डिफेन्स गन मिळणार आहे. सुरुवातील सहा एके-630 एअर डिफेन्स गन सिस्टम खरेदीसाठी आरएफपी जारी करण्यात आले आहे.

या बंदुकीचा वापर अनमॅन्ड एरियल व्हेइकल्स, रॉकेट, आर्टिलरी अँड मोटर यांसारख्या हल्ल्यांना रोखण्यासाठी केला जाईल. तसेच आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ महत्त्वपूर्ण लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात तसेच धार्मिक स्थळांची सुरक्षा करण्यासाठी तैनात केले जाईल. या बंदुकीची मारक क्षमता 4 किलोमीटरपर्यंत आहे. या बंदुकीतून एका मिनिटात 3 हजार राऊंड गोळ्यांचा मारा केला जातो.

बंदुकीची खास वैशिष्ट्ये

प्रत्येक बंदुकीतून 1 मिनिटात 3 हजार राऊंड फायर होऊ शकते. याची मारक क्षमता 4 किलोमीटरपर्यंत आहे. या बंदुकीला कुठेही तैनात केले जाऊ शकते. प्रत्येक युनिटमध्ये ऑल-वेदर इलेक्ट्रो-ऑप्टिकल फायर कंट्रोल सिस्टम असेल. खराब हवामानातसुद्धा या बंदुकीतून लक्ष्य गाठता येऊ शकते. सीमावर्ती भागात ड्रोन, रॉकेट, आर्टिलरी आणि मोटरसारख्या हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी या बंदुकीचा खास वापर केला जाईल.