सरकारने केलेल्या घोषणा या शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या आहेत, अंबादास दानवे यांची टीका

अतिवृष्टीने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची गरज आहे. पण सरकारने पुन्हा ‘आकडेफेक’ केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 31 हजार 628 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पण हेक्टरी सरसकट 50 हजार दिले नाहीच सोबत कर्जमाफीच्या घोषणेला त्यांनी बगल दिली. यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. सरकारने केलेल्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची टीका दानवे यांनी केली.

”सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने 50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी. बळीराजाची सरसकट कर्जमुक्ती करावी. पिक विम्याचे निकष पूर्ववत करावे. पुरात वाहून गेलेल्या घरांची, जनावरांची व दुकानांची आर्थिक भरपाई मुबलक देण्याची आवश्यकता असताना आज मुख्यमंत्र्यांनी तुटपुंजी मदत घोषित करून शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना थेट खात्यात पोहोचणारी मदत करणे राज्य सरकारची जबाबदारी होती.मात्र मुख्यमंत्र्यांनी फक्त मोठी घोषणा करून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. 10 हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घोषित करून शेतकऱ्यांच्या नावावर गुत्तेदारांच्या घशातच पैसे घालण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेल अशी कोणतीही मदत मुख्यमंत्र्यांनी जाहिर केली नाही. पीएम आवास योजनेतून नुकसानग्रस्त नागरिकांना घरे देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मी पूर्ण जबाबदारीने सांगतो 2016 साली पीएम आवास योजनेत मंजूर झालेल्या घरांना अद्याप पर्यंत निधी मिळालेला नाही. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने घरांच्या दुरुस्तीची गरज असताना पुढील 10 ते 15 वर्ष लाभ न मिळणाऱ्या योजनेच्या माध्यमातून गाजर दाखवण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. अशाच प्रकारे सर्व घोषणांची स्थिती असून या फक्त शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या आहे”, असे दानवे यांनी ट्विट केले आहे.