
राज्यात काही भागांतून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्याला परतीच्या पावसाने मोठा दणका दिला असून मराठावाडा, विदर्भासह अनेक भागात पिके भूईसपाट झाली तसेच अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मुंबईतही गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली असल्याने मुंबईत उन्हाचा ताप आणि उकाड्यात वाढ झाली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून मुंबईसह इतर भागात तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. तसेच सरासरी तापमानातही वाढ झाली आहे. सरासरी तापमान 32 अंशांपर्यंत पाहोचले आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा ताप फारसा नसणार, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दिवसाचे तापमान साधारण 32 -33 अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर, किमान तापमान मात्र सरासरीइतके राहील,असा अंदाज वर्तवण्यात आल्याने मुंबईकरांना ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळणार आहे.
देशभरातूनही मॉन्सूच्या माघारीचा प्रवास सुरू आहे. दिल्लीत तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत पावसाची शक्यता नाही, ज्यामुळे येत्या काही दिवसांत हवामान सामान्य राहील. हवामान विभागाने तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप आणि उत्तर हिंदुस्थानात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 8 ते 12 ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडूच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केरळमध्ये 8 ते 13 ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे. 8 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
उत्तर हिंदुस्थानात हवामानात बदल होत आहेत. 8 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर सखल भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये काही ठिकाणी गडगडाटी वादळे आणि जोरदार वाऱ्यांसोबत पाऊस पडू शकतो. पूर्व आणि मध्य हिंदुस्थानातही पावसाळी वातावरण कायम राहील. पश्चिम मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी गडगडाटी वादळे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, झारखंड आणि बिहारमध्येही वादळ आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे.