रिंकू सिंह ‘डी कंपनी’च्या निशाण्यावर; 5 कोटींच्या खंडणीची मागणी, मुंबई क्राइम ब्रँचकडून तपास सुरू

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू आणि नुकत्याच पार पडलेल्या आशिया कपच्या अंतिम लढतीत चौकार ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या रिंकू सिंह याला डी कंपनीने धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. दाऊदच्या गँगने रिंकूकडे 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणी तपास सुरू असून काही आरोपींना बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा झिशान यालाही धमकीचे फोन येत होते. त्याच्याकडे 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नवीद यांना वेस्ट इंडिजमधून बेड्या ठोकल्या होत्या. पोलीस चौकशीमध्ये या आरोपींनी क्रिकेटपटू रिंकू सिंह याच्याकडेही खंडणीची मागणी केली होती, अशी कबुली दिली. मुंबई गुन्हे शाखेने याबाबत माहिती दिली आहे. आयएएनएसने याबाबत वृत्त दिले.

आरोपींनी रिंकू सिंह याला फेब्रुवारी ते एप्रिल 2025 दरम्यान धमकीचे तीन मेसेज पाठवले होते. सुरुवातीला आरोपीने आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. परंतु यास प्रतिसाद न मिळाल्याने त्याने दुसरा मेसेज करत 5 कोटी रुपये मागितले आणि तिसऱ्या मेसेजमध्ये इंग्रजीत रिमांडर, डी कंपनी‘, असे लिहिलेले होते.

आरोपींनी याच काळात झिशान सिद्दिकीलाही धमकीचे मेल केले होते. खंडणी दिली नाही तर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपींनी दिली होती. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.