
ठाणे महापालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी केदार पाटील आणि भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती रमेश आंब्रे यांच्यात एका विकासकामावरून बुधवारी वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या आंब्रे यांनी रात्री ९ वाजता २० ते ३० गुंडांना घेऊन घरात घुसल्याचा आरोप केदार पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला गलांडे-पाटील यांनी केला आहे. धमकी, शिवीगाळ, स्टंटबाजी केल्याप्रकरणी त्यांनी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, केदार पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला गलांडे-पाटील यांनी महिलांसह आंब्रे यांच्या हिरानंदानी मेडोज येथील इमारतीखाली जाऊन आज ठिय्या दिला.
मानपाडा येथील एका उद्यानाच्या प्रकल्पावरून भाजप नगरससेविका स्नेहा आंब्रे यांचे पती रमेश आंब्रे आणि उद्यान विभागाचे अधिकारी केदार पाटील यांच्यात वाद झाला. रस्त्यावरचा हा वाद आता घरापर्यंत पोहोचला आहे. जाब विचारण्यासाठी आंब्रे हे आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन केदार पाटील यांच्या घरी गेले होते, परंतु हे सर्वजण जबरस्तीने घरात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केदार पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील यांनी केला आहे.