
बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टॉलचे परवाने बनवून महापालिकेची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रकाश आहिरे असे या भामट्याचे नाव असून त्याने या बोगस स्टॉल परवान्यांच्या मदतीने जवळपास १४ स्टॉल उभारले आहेत. त्यातील दोन स्टॉल स्वतःच्या नावावर व इतर १२ स्टॉल ओळखीतील नागरिकांना वाटप केले आहेत. त्यासाठी त्याने ७ लाख रुपये उकळल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
खोट्या सह्या व कागदपत्रांच्या मदतीने भुईभार भरून एकाच जावक क्रमांकाचे अनेक स्टॉल उभारल्याप्रकरणी २० जून २०२४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तत्कालीन कनिष्ठ अभियंता शैलेश शिंदे याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी आता प्रकाश आहिरेच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याने स्टॉलचे बनावट कागदपत्र बनवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
चार दिवस कोठडी
न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी महापालिकेची फसवणूक करून स्वतःच्या नावांवर दोन स्टॉल उभारल्याप्रकरणी कठोर कारवाई करून त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्याची मागणी महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी पोलीस उपायुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.