नाशिक शहर आणि जिल्ह्यात साडेतीन लाख दुबार, बोगस मतदार; शिवसेनेने पुराव्यानिशी मतदार यादीतील घोळ आणला समोर

महायुती सरकारने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर दबाव टाकून नाशिक शहर व जिह्यातील विधानसभा मतदारसंघात तब्बल 3 लाख 53 हजार 949 दुबार व बोगस मतदार हे याद्यांमध्ये घुसविल्याचे शिवसेनेने पुराव्यांसह चव्हाट्यावर आणले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक व निष्पक्ष पार पाडण्यासाठी ही नावे वगळावीत, मतदान केंद्रांवर अचूक अशी अंतिम चिन्हांकित यादी पाठवावी, अशा मागण्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन केल्या.

शहरातील तीन व शहर-ग्रामीण भाग असलेला देवळाली अशा एकूण चार मतदारसंघांत आणि जिह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघांत तब्बल 3,53,949 इतके मतदार हे दुबार, बनावट आणि स्थलांतरीत स्वरूपाचे आहेत, असे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीतून निदर्शनास येत आहे. यात बनावट, स्थलांतरीत आणि मृत्यू झालेल्या मतदारांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानातही मोठय़ा संख्येने दुबार, बनावट व स्थलांतरीत मतदारांनी एकापेक्षा अधिक मतदारसंघात बोगस मतदान केल्याने सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांना व विशिष्ट उमेदवारांना त्याचा फायदा झाला, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी संविधानानुसार मतदानाचा हक्क बजावण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदार यादीतील वरील दुबार व बोगस नावे तत्काळ वगळावीत, शहर व जिह्यातील मतदान केंद्रांवर अचूक चिन्हांकित यादीची प्रत जावी, या नावांचा समावेश करताना त्यांचे कोणते रहिवाशी व अन्य पुरावे घेतले गेले होते याचीही सखोल चौकशी व्हावी, मतदार यादीत नावनोंदणीची सदोष प्रक्रिया राबवणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत या मागण्या करण्यात आल्या.

भ्रष्ट व गैरमार्गाने नोंदवण्यात आलेल्या दुबार नावांची विधानसभानिहाय यादी या निवेदनासोबत सादर करण्यात आली. ही नावे तातडीने वगळण्याची कार्यवाही करावी, त्यानंतरच शहर व जिह्यातील मतदान केंद्रांवर अचूक चिन्हांकित मतदार यादी जाईल याची दक्षता घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. जिह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील दुबार नावांच्या संख्येची यादी, तसेच दुबार नावांच्या पुराव्यांचे गठ्ठे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, कोअर कमिटी सदस्य केशव पोरजे, भारती ताजनपुरे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक स्वाती पाटील, वृषाली सोनवणे उपस्थित होते.

कुठे किती दुबार मतदार

  • नाशिक पूर्व मतदारसंघ – 1,13,351
  • नाशिक मध्य मतदारसंघ – 71,940
  • नाशिक पश्चिम मतदारसंघ – 1,09,620
  • नाशिक देवळाली मतदारसंघ – 59,038

निवडणूक आयुक्तांकडे दाद मागणार – सूर्यवंशी

पैसे घेऊन दुबार, बनावट नावे नोंदवून मतदान करून घेणारी टोळी सक्रिय आहे, याच जोरावर महायुतीने गठ्ठेच्या गठ्ठे नावे नोंदवत विधानसभा निवडणुका जिंकल्या हे आम्ही आज पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हालाच ‘बूथ स्तरावर फॉर्म भरून द्या, विधानसभा मतदारसंघ स्तरावरील अधिकाऱ्यांना या याद्या द्या, मी आदेश देईन, फिल्टर लावून नावे वगळण्याचा प्रयत्न करू’, असे सांगितले. त्यांच्या या उत्तराने आमचे समाधान झालेले नाही. आम्ही प्रयत्न सोडणार नाही, याप्रश्नी राज्य निवडणूक आयुक्तांना भेटणार, प्रसंगी दिल्लीत जाणार, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.