घारापुरी बेटावर ब्लॅक आऊट; महावितरणचा गलथान कारभार, पर्यटक, व्यावसायिक, रहिवासी त्रस्त

जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटावर गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ब्लॅकआऊट झाला असून पर्यटक, व्यावसायिक आणि स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर हा ब्लॅकआऊट झाल्याने स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत करावा अशी मागणीदेखील महावितरण कंपनीकडे करण्यात आली आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गावकऱ्यांना पाणीपुरवठा करणेही ग्रामपंचायतीला अशक्य होत आहे. तसेच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वीजपुरवठा खंडित होण्याबाबत महावितरणकडून कोणत्याही प्रकारच्या आगाऊ सूचना दिल्या जात नाहीत. संतापजनक बाब म्हणजे महावितरण विभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी एलिफंटा बेटावर राहत नसल्याने रहिवाशांनी तक्रारी कुठे व कुणाकडे करायच्या हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना
सदोष केबल्समुळे घारापुरी बेटावर वारंवार बीजपुरवठा खंडित होत आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या तक्रारीनंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती महावितरणच्या पनवेल विभागाचे मुख्य अभियंता जितेंद्र माने यांनी दिली.

फक्त २२ केव्ही क्षमतेची केबल
न्हावा येथील टी. एस. रेहमान येथील ३३ केव्हीए क्षमतेची केबल काढून त्याऐवजी आता २२ केव्हीए क्षमतेच्या एलिफंटा बेटावर वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे मागील तीन वर्षांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली असल्याचा आरोप घारापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर यांनी केला आहे.