
स्मार्ट सिटीची टिमकी वाजवणाऱ्या ठाण्यात दिव्याखाली अंधार असल्याचे दिसून आले आहे. दिव्यातील पूर्व पश्चिमेला जोडणारा अतिमहत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम गेल्या सात वर्षांपासून अपूर्ण स्थितीत आहे. त्यामुळे नागरिकांना फाटकातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रुग्णवाहिका तर रोज रेल्वे फाटकात तासन्तास अडकत असल्याने तातडीची मदत हवी असलेल्या रुग्णांची फरफट होत आहे. वेळीच रुग्णवाहिका पोहोचली नाही तर आपत्कालीन काळात मदतीसाठी कुठे जायचे, असा सवाल दिवावासीयांनी उपस्थित केला आहे. हा रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
दिव्यातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम २०१९ मध्ये एमएमआरडीए अंतर्गत सुरू करण्यात आले. २०२३ मध्ये रेल्वे फलाटांवर गर्डर टाकण्याचे आणि पिलर उभारण्याचे काम पूर्ण झाले. मात्र पुलाचे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे. परिणामी रेल्वे फाटकामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून दररोज वाहतूककोंडी होते. या वाहतूककोंडीचा फटका दररोज रुग्णवाहिकांना बसतो. या लटकंतीमळे रुग्णांचा जीव धोक्यात आल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवालही दिवावासीयांनी केला आहे.
हे सर्व कधी थांबणार?
दिवा रेल्वे स्टेशन परिसरात रस्ता रुंदीकरण झाले पण चालायला जागा नाही, अर्धवट ब्रिज, फुटपाथ फेरीवाल्यांनी गिळले. त्यामुळे पूल कधी तयार होणार, रस्ते मोकळे कधी होणार, फेरीवाल्यांची दादागिरी कधी थांबणार, पार्किंग कधी हटणार, असा सवाल दिवावासीयांनी केला आहेत.