
इजिप्तमध्ये सोमवारी झालेल्या गाझा शांतता परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानचे कौतुक केले. हिंदुस्थान हा महान देश असून आता हिंदुस्थान आणि पाकिस्तान चांगल्याप्रकारे एकत्र राहतील. या वक्तव्यानंतर त्यांनी स्टेजवर त्यांच्या मागे उभे असलेले पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे वळून विचारले, हो की नाही? हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. टॅरिफवरून अमेरिका आणि हिंदुस्थानमध्ये तणाव असताना ट्रम्प यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
ट्रम्प म्हणाले की, हिंदुस्थान एक महान देश आहे, तसेच माझा चांगला मित्रही आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. तसेच आता हिंदुस्थान आणि पाकिस्तान चांगल्याप्रकारे एकत्र राहतील. हिंदुस्थान हा एक उत्तम देश आहे, ज्याचे नेतृत्व एका चांगल्या मित्राकडे आहे. आणि त्यांनी खूप चांगले काम केले आहे. मला वाटते की पाकिस्तान आणि भारत एकमेकांशी चांगले वागतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यासोबत गाझा शांतता शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवणाऱ्या ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाचे कौतुक केले आणि म्हटले की प्रादेशिक शांतता चांगल्या मित्रांनी एकत्र काम करण्यावर अवलंबून आहे. त्यांच्या मागे उभे असलेल्या शाहबाज शरीफ यांच्याकडे लक्ष वेधून त्यांनी उपहास केला, “ते हे घडवून आणण्यास मदत करतील ना?”
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेतले. त्यांनी इस्रायली संसद, नेसेटमध्ये आपले भाषण संपवले आणि दावा केला की हा त्यांनी सोडवलेल्या आठ वादांपैकी एक आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये 10 मे रोजी झालेल्या युद्धबंदीनंतर ट्रम्प सातत्याने युद्धबंदीचे श्रेय घेत आहेत. तथापि, भारताने वारंवार स्पष्ट केले आहे की दोन्ही सैन्यांच्या महासंचालकांमधील चर्चेनंतर हा करार झाला होता आणि त्यात कोणताही तृतीय पक्ष हस्तक्षेप नव्हता. मात्र, तरीही ट्रम्प यांचे घोडे दामटणे सुरुच आहे.