
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी ईव्हीएम मशिनमध्ये व्हीव्हीपॅट लावण्याचा आग्रह धरला. मतदाराला त्याने नेमके कोणाला, कोणत्या पक्षाला मतदान केले आहे हे समजण्याचा अधिकार आहे. त्यासाठी व्हीव्हीपॅट लावलेच पाहिजेत. प्रभाग पद्धतच नसलेल्या मुंबईत जर व्हीव्हीपॅट लावलेल्या ईव्हीएम निवडणूक आयोग देत नसेल तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. देशात आता कुठेच निवडणुका नाहीत. त्यामुळे व्हीव्हीपॅट मिळण्यात कोणतीच अडचण दिसत नाही. व्हीव्हीपॅट उपलब्ध करा, अशी सूचनाही उद्धव ठाकरे यांनी केली. मतदार याद्यांमधील गोंधळावर त्यांनी बोट ठेवले.
प्रभाग पद्धतीने जिथे निवडणुका होणार आहेत, तिथे व्हीव्हीपॅट पद्धत वापरता येणार नाही, असे आयोग म्हणतो. मग प्रभाग पद्धतच रद्द करा. तिचा मतदारांना काय उपयोग? मतदारांनी चार चार वेळा मतदान का करायचे? निवडणुकांनंतर कामासाठी त्यांनी कोणत्या नगरसेवकाकडे जायचे? तेच नगरसेवक आपापसात व्रेडिटसाठी आणि इतर गोष्टींसाठी भांडत बसतात. मग प्रभागाकडे कोण बघणार? ही अशी पद्धत संपूर्ण भारतात कुठेच नाही. मग फक्त महाराष्ट्रातच का? सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी का? या प्रश्नावर चोक्कलिंगम यांना उत्तर देता आले नाही.