केडीएमसी कर्मचाऱ्यांना 20 हजार बोनस; साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये दिवाळी बोनस (सानुग्रह अनुदान) देण्याची घोषणा आयुक्त अभिनव गोयल यांनी केली. दिवाळीपूर्वी सर्वांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

गतवर्षी १६ हजार रुपये ५०० बोनस दिला होता. यावर्षी यामध्ये वाढ करून तो २० हजार करण्याची मागणी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास, सरचिटणीस सचिन बासरे यांनी आयुक्तांकडे केली होती. पालिकेतील ६ हजार ३७६ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय आशा वर्कर यांना ५ हजार रुपये बोनस दिला जाणार आहे. महापालिकेच्या प्रशासन, परिवहन विभाग, शिक्षण मंडळातील स्थायी, अस्थायी तसेच २७ गावांतील सर्व कर्मचाऱ्यांना हा लाभ दिवाळीपूर्वी दिला जाणार आहे. पालिकेने बोनस जाहीर केल्याबद्दल म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त वंदना गुळवे, मुख्य लेख अधिकारी दिग्विजय चव्हाण, मुख्य लेख परीक्षक सुरेश बनसोडे यांचे आभार मानले.

उल्हासनगर पालिकेची खूशखबर
उल्हासनगर – उल्हासनगर महानगरपालिकेनेही कर्मचाऱ्यांना खूशखबर देत १८ हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला. बोनसमध्ये मागच्या वर्षीपेक्षा एक हजार रुपयांची वाढ केल्यामुळे १६०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. सन्मानजनक बोनस जाहीर केल्याबद्दल विविध कामगार संघटनांनी आयुक्त मनीषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, मुख्यलेखा परीक्षक अभिजित पिसाळ यांचे आभार मानले.