अहमदाबाद महामार्गावरील ट्रॅफिककोंडीत मुंबईचे विद्यार्थी आठ तास अडकले; राज ठाकरेंचा फोन जाताच मिळाला दिलासा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या वाहतूककोंडीचा मोठा फटका मुंबईतील ५०० विद्यार्थ्यांना बसला. दादर येथील शारदाश्रम शाळा आणि मालवणी येथील मदर टेरेसा महाविद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक सहल आणि इंडस्ट्रीयल व्हिजिटसाठी वसई-विरार परिसरात मंगळवारी आले होते. ते सायंकाळी पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर त्यांच्या बसेस वर्सोवा पूल ते वसई फाटादरम्यान आठ तास वाहतूककोंडीत अडकून पडले. शारदाश्रम शाळेच्या व्यवस्थापनाने मदतीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती केली. राज ठाकरे यांचा फोन जाताच सर्व विद्यार्थ्यांची वाहतूककोंडीतून सुटका झाली आणि शाळा व्यवस्थापन व पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

शारदाश्रम शाळातील १८५ आणि मदर टेरेसा महाविद्यालयातील ३०० विद्यार्थी वसई १२ बसेसमधून मंगळवारी वसई आणि विरार परिसरात आले होते. सकाळी आलेले हे विद्यार्थी सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांच्या बसेस मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पूल ते वसई फाटादरम्यान आल्यानंतर महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आणि हे विद्यार्थी अडकून पडले. आठ तास झाले तरी या बसेस वाहतूककोंडीतून बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे शाळेचे व्यवस्थापन आणि पालक टेन्शनमध्ये आले. शारदाश्रम शाळेच्या व्यवस्थापनाने मदतीसाठी राज ठाकरे यांनी विनंती केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी वाहतूककोंडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या सूचना मनसेचे नेते अविनाश जाधव आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या. ठाकरे यांचा फोन येताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने महामार्गावर धाव घेतली. प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली. आठ तास वाहतूककोंडीत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी नजीकच्या रॉयल गार्डन रिसॉर्टमध्ये नेले. तिथेच त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.