
गायत्री मंत्र ते रुपेरी वाळूच्या माडाच्या बनात ये ना, धिरे धिरे से मेरी जिंदगी आना, जिये तो जिये वैâसे, नजर के सामने, हर करम अपना करेंगे ये वतन तेरे लिये या व अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांनी आज प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांनी नांदेडच्या दिवाळी पहाटचा कार्यक्रम गाजवला. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती.
जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, सचखंड गुरुव्दारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या विद्यमाने गेल्या तेरा वर्षापासून गोदावरी तटावर बंदाघाट येथे या दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील सलग तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, आमदार हेमंत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, आमदार आनंद पाटील तिडके बोंढारकर व संयोजन समितीच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
या सांगीतिक सोहळ्याची सुरुवात पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायत्री मंत्रोच्चाराने होताच संपूर्ण परिसर पवित्रतेने भारून गेला. ‘संगीत अनुराधा’ या शीर्षकाखाली सादर झालेल्या त्यांच्या मैफिलीत भक्ती, प्रेम, देशभक्ती आणि लोकसंगीताचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. मैफिलीची सांगता पौडवाल यांनी भक्तिभावाने ‘हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला…’ या गाण्याने केली. कार्यक्रमात सहगायक म्हणून रवींद्र अहिरे, व रेषमा उपासे, तबला-ढोलकावर गौरव बोयाना, आदेश मोरे, संवादिनीवर आयुषी बोयाना, सिंथेसायझरवर किरण वेहेळेकर, तर ऑक्टोपॅडवर राकेश पुलेकर यांनी अनुराधाजींच्या गायकीला मनभावी सुरसाथ दिली. यावेळी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा आयुक्त डॉ.महेश डोईफोडे यांनी सत्कार केला.