36 हजार फूट उंचीवर विंडशील्ड फुटले; दुर्घटनेत पायलट जखमी, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

अमेरिकेच्या डेनवरहून लॉस एंजेलिसकडे जात असलेल्या विमानाला 36 हजार फूट उंचीवर असताना अपघात झाला. युनायटेड एअरलाइन्सच्या बोइंग 737 मॅक्स 8 उड्डाणावेळी ही दुर्घटना घडली. विमानाची विंडशील्ड म्हणजेच समोरची काच तुटली. या दुर्घटनेत विमानाचा पायलट जखमी झाला आहे. या दुर्घटनेनंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. बोइंग 737 यूए1093 विमानात एकूण 140 प्रवासी आणि क्रू मेंबर होते. दुर्घटना घडली तेव्हा विमान 36 हजार फूट उंचीवर उड्डाण करत होते. या दुर्घटनेचा फोटो आता समोर आला आहे.

विंडशील्ड तुटल्याने अपघात झाल्यानंतर विमानाला तत्काळ 26 हजार फुटांवर खाली आणण्यात आले. त्यानंतर सॉल्ट लेक सिटी विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर दुसरे विमान बोइंग 737 मॅक्स 9 मध्ये बसवून लॉस एंजेलिसला पाठवण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत प्रवाशांना कोणतेही नुकसान झाले नाही. सर्व प्रवाशी सुरक्षित असून या दुर्घटनेमुळे प्रवासी 6 तास उशिराने पोहोचले. उड्डाण करताना विमानाचे विंडशील्ड फुटण्याच्या घटना खूपच कमी होतात, परंतु या घटनेत पायलट जखमी झाल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. या दुर्घटनेचा फोटो व्हायरल झाला असून पायलटच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे.

का फुटले विंडशील्ड

जाणकारांच्या माहितीनुसार, विमानाच्या उड्डाणावेळी एखादे छोटे उल्कापिंडची टक्कर बसल्याने हे विंडशील्ड फुटले असावे. कारण या दुर्घटनेत पायलटचा हात जळाला आहे. तसेच विंडशील्ड हे पक्ष्याची धडक बसल्यानंतर फुटणार नाही. युनायटेड एअरलाइन्सने सांगितले की, कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. तसेच पायलटला किरकोळ जखम झाली आहे, परंतु कंपनीने ही दुर्घटना कशामुळे झाली आहे, याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही.