
दिवाळी सण सुरू आहे. लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिप्रदानिमित्त मंगळवार, बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही मूहूर्त ट्रेडिंग होणार असून यंदा प्रथमच मूहूर्त ट्रेडिंग संध्याकाळऐवजी दुपारी होणार आहे. बीएसई आणि एनएसईवर मंगळवारी विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित होत आहे. हे ट्रेडिंग सत्र दुपारी १:४५ ते २:४५ या वेळेत होणार आहे. अनेक दशकांत पहिल्यांदाच पारंपारिक संध्याकाळच्या सत्राऐवजी दुपारच्या सत्रात बदलली आहे. भारत संवत २०८२ मध्ये प्रवेश करत असताना हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
गेल्या दहा वर्षांत राष्ट्रीय म्हणजेच निफ्टी 50 निर्देशांकाने सरासरी १२-१५% वार्षिक परतावा मिळवला आहे. दिवाळी २०२४ ते दिवाळी २०२५ पर्यंत शेअर बाजारात मर्यादीत वाढ झाली. निफ्टी ५० निर्देशांक सुमारे ५% ने वाढला आणि सेन्सेक्स सुमारे ४% ने वाढला आहे. जागतिक अनिश्चितता आणि देशांतर्गत आव्हाने यामुळे वाढीचा वेग मंदावला असल्याचे सांगण्यात येते.
शेअर बाजारात मूहूर्ताचे विशेष सत्र मंगळवारी दुपारी १:३० ते 2.45 या वेळेत होणार आहे. यात 1.30 ते 1.45 प्रिओपन सत्र असेल. मुहूर्त ट्रेडिंग हा सौभाग्याचा काळ मानला जातो: अनेकांना वाटते की या काळात केलेले व्यवहार नशीब, संपत्ती आणि संपूर्ण वर्षासाठी अनुकूल परतावा देतात. पारंपारिकपणे, व्यावसायिक संस्था चोपडा पूजन करतात आणि या काळात त्यांचे प्रारंभिक व्यवहार किंवा प्रतीकात्मक खरेदी करतात.
सध्या बाजारात तेजी असून निफ्टी 25,500 या महत्त्वाच्या टप्प्याच्या पुढे आहे. तर सेन्सेक्स 84,400 अंकांजवळ आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे मूहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी उच्चांक गाठणार का? याची उत्सुकता आहे. तसेच या आधी काही अपवाद वगळता मूहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी बाजारात तेजी असल्याचे दिसून येते.