
प्रेयसीच्या आईने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची अट घातल्याने विवाहास नकार दिला, असा बनाव करणाऱ्या आरोपीला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली. न्यायालयाने या आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला. अभिमन्यू त्यागी असे या आरोपीचे नाव आहे. अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यागीविरोधात लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. यात होणारी अटक टाळण्यासाठी त्यागीने याचिका केली होती.
न्या. एन.आर. बोरकर यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मी विवाह करण्यास तयार होतो. पण प्रेयसीच्या आईने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची अट घातली. त्यामुळे लग्नास नकार दिला. आमच्यातील शारीरिक संबंध स्वेच्छेने होते. परिणामी अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यागीने केली. लग्नासाठी धर्मांतर करण्याची अट घालण्यात आल्याचा कोणताच पुरावा सादर झालेला नाही. याउलट त्यागीने विवाहाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे तूर्त तरी स्पष्ट होत आहे, असे नमूद करत न्यायालयाने त्यागीची याचिका फेटाळून लावली.
गर्भपात करण्यास सांगितले
त्यागी व पीडिता एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. 2022मध्ये लग्नाचे आमिष दाखवून त्यागीने शारीरिक संबंध ठेवले. नंतर पीडिता गरोदर राहिली. त्यागीने तिला गर्भपात करण्यास सांगितले. 2025पर्यंत तो अत्याचार करत होता. नंतर त्याने विवाहास नकार दिला. पीडितेने याच्यावर गुन्हा दाखल केला.

























































