
संगमनेर विधानसभा मतदारसंघात साडेनऊ हजार बोगस मतदार असल्याचा धमाका कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिवाळीच्या तोंडावर केला होता. ही फक्त ग्रामीण भागातील संख्या होती. शहरातील आकडा जोडल्यास संगमनेरमधील ही संख्या 15 हजारांपर्यंत जाऊ शकते, असा दावा थोरात यांनी केला आहे.
संगमनेरच्या मतदार यादीत काही मयत व्यक्तींची नावे, काही दुबार नोंदी, तर काही नावे अशी आहेत की ती कुठून आली हे समजत नाही. शहरातील आकडा जोडला तर ही संख्या 15 हजारांपर्यंत जाऊ शकते. मतदार यादीतील चुकांबाबत हरकती नोंदवल्या असल्या तरी तहसीलदार मतदार यादी दुरुस्त करण्याचे अधिकार नसल्याचे सांगतात. मग हरकती का मागवता? डिजिटल युगात या चुका सहज दुरुस्त होऊ शकतात. पण हे का होत नाही? यामुळे राज्य आणि देशपातळीवर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण होते, असे थोरात म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटील हे जिह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी माझ्या आरोपांची सत्यता तपासावी. केवळ उत्तर देण्यासाठी बिनबुडाचे आरोप करणे योग्य नाही. मतदार यादीतील त्रुटींची चौकशी करून सत्य समोर आणा, असा पलटवार थोरात यांनी केला.
निवडणुकीत घोटाळय़ांचा भाजपचा डाव
निवडणुकीत घोटाळे घडवण्याची पद्धत भाजपने आणली आहे. मतदार यादीतील घोळ हा त्याचाच एक भाग आहे. विधानसभा निवडणुकीतील घोळ आजही कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही असाच घोळ कायम राहिल्यास लोकशाही धोक्यात येईल, असे थोरात म्हणाले.


























































